या महाराष्ट्राच्या मातीत आणि माणसांच्या मनात स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे ज्यांनी बीज रोवले असे छत्रपती शिवाजी महाराज आज दिवशी म्हणजे १९ फेब्रुवरी १६३० रोजी, शिवनेरीवर जिजाऊ साहेबांच्या पोटी जन्मले. जिजाऊ साहेबांनी आणि शहाजी राजांनी केले संस्कार तुमच्या माझ्या सारख्याच जन्माला आलेल्या शिवबाला शिव-छत्रपती करून गेले.
इतक्या शतकानंतरही शिवाजी महाराजांचे आपण स्मरण करतोय याचे कारण या मातीवर, इथच्या माणसावर शिवाजी महाराजांनी केलेले उपकारच होय. सरदारकी हाताशी असतांना, जनतेबद्दल कळवळ नसती तर, स्वराज्याची नसती उठाठेव महाराजांनी केलीच नसती. पण इतरांचे दुख: बघून ते समजल्याने, त्याची तीव्रता अनुभवल्याने महाराजांना पुढे स्वराज्याचे स्वप्न साकार करता आले. स्वराज्याला मूर्त रूप देत आले.
महाराजांचा हा गुण. हा दुख: समजण्याचा गुण, महाराज एक संवेदनशील, जबाबदार आणि म्हणूनच जाणते राजे होते हे दाखवतो. 'हे' जवळपास सगळ्यांनाच माहित आहे! पुढे काय?
अहो पण, इथेच तर गेल्या काही वर्षां पासून आपण चुकतोय. त्यांच्या या गुणाला "फक्त एक ओळ" किंवा भाषणात "शिवाजी महाराज की…" म्हणायच्या आधीचा डायलॉग म्हणून सोडून, "पुढे काय?" हा वायफळ प्रश्न विचारतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराजांना समजायचे असेल तर त्यांच्यातला हा गुण तुम्ही-मी परत एकदा अभ्यासायला हवा.
जिजाऊ साहेबांनी यासाठीच तर परकियांच्या अन्यायाने जनतेचे होणारे हाल स्वतः महाराजांना सांगितले होते. इतरांचे दुख: महाराजांना समजावे म्हणून सांगितलेलं हे सगळ महाराजांनी काळजावर कोरल आणि आपल्याच 'रायेतेचे राज्य' उभे केले. जिथ परकीयांची भीती नसेल. भय नसेल. चूक नसतांना येणारे दुख: नसेल. असे राज्य.
मग इतके सगळे एका दुख: समजून घेण्याच्या गुणाने होत असेल तर अनेक शतकांपासून कोणतीही चूक नसतांना दुख: भोगणारे इथे आहेतच कसे? कदाचित याचे कारण, महाराजांचा हाच गुण डोक्यात घ्यायचा सोडून त्याच्या पुढे - 'महाराजांनी कसा अफजल्याचा चोथळा बाहेर काढला…'- याच्या अतिरंजित वर्णनात आपण रमलो, हे असावे. बर इथे थोडीच आपण थांबतो, इथून पुढेही ते आम्हाल सांगतात आणि आम्ही ऐकतो, "… मागे एकदा फलाण्या जागेवर महाराजांच्या पुतळ्याची विटंबनां झाली तेंव्हा "हजारो" मावळे त्या ठिकाणी आले आणि बघतच क्षणी कित्येत दुष्मनांची मुंडकी छाटली गेली…. वगैरे वगैरे … म्हणून आज 'त्या' सगळ्यांना सांगतो महाराजांच्या वाटी जाल तर आडवे पडू……".
'हे असले' लोक आम्हाला शिवाजी शिकवतात. म्हणूनच मागच्या काही दशकात आम्ही 'देव शिवाजी' इतका पुजला की, आज त्याच्या नावे गावोगावी हजारो चौक असतील आणि काही शेकडो एक मंदिरे असतील. ही आमची कामगिरी! खरतर इथच्या मातीच्या कणाकणावर ज्याचा अधिकार, त्याला चौकापुरते आणि मंदिरापुरते करून ठेवले आम्ही. मंदिर किंवा चौक पूर्णतः गैर नाही. एक स्मरण म्हणून ते चांगले पर्याय आहेत. पण त्या चौकातून जाणारी प्रत्येक मुलगी, दुसरीकडे जाऊद्या, त्या चौकात तरी सुरक्षित राहील, हे कधी बघितलेय का आपण? तर नाही.
महाराजांनी जनतेचे दुख: ओळखले शेतसारे माफ केले. लेकी-बळींना अभय दिले. पण आज मात्र आम्हीच स्वकीयांचे रक्त विकून येणाऱ्या पिढ्यांसाठी जागोजागी फ्ल्याट आणि भूखंड कसे मिळवता येतील या योजनेत गुंतलेले आहोत. आणि ओरडलेच कुणी तर जेवतांना कुत्र्याला टाकतात तशी भाकर फेकून मोकळे होतो. लेकी-बळीं चे विचारूच नका, त्यांची सुरक्षा आम्ही (अस्तित्वात नसलेल्या) शासन व्यस्थेच्या हाती दिलीये. म्हणजे एकंदर कुणालाही 'लेखी' असे काही प्रोब्लेम्स नाहीयेत.
शिवाजी महाराजांच्या या जयंती निमित्य थोडं मागे वळून पाहिल्यास जयंतीला शक्तिप्रदर्शनाचा एक मंच अनेकांनी बनवल्याचे जनवतेय. छत्रपतींच्या मावळ्यांनी खरे तर समाजातील दुखीतांचे दुख: समजून त्यावर उत्तरे शोधायला हवीत. जातीपातींच्या बेड्यात जखडलेला समाज मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हातात आलेला मोबाईल आणि त्यावरील फेसबुक आणि व्हाट्स-अप ने प्रगती आपल्या पर्यंत हवी तशी पोहचली या अर्धवट सत्यात मावळ्यांनी तरी राहू नये. तुम्ही बघितला नसेल तर, एकदा 'फॅंड्री' हा चित्रपट नक्की बघा. समाजात अजूनही अनेक वर्ग आहेत ज्यांच्या हात आणि तोन्डाची भेट व्हयाची असेल तर त्यांना अजून ही आपल्या 'स्वभिमानासारख्या' मुलभूत हक्काला मुकावे लागते. अजूनही आपण, कधी कळत आणि कधी न-कळत, वर्षानुवर्षे चलत आलेली जातीयतेची री तशीच ओढत अलोयेत. या अदृश्य रेषांनी आपली मने दुभंगलीयेत. कित्येक शिवाजी चित्रपटातील जब्या आणि पिऱ्या सारख्या मुलात घाबरून दडून बसलेत. बाहेरची सरंजामी कदाचित परकीय मुघलांपेक्षाही अन्यायकारक वाटत असावी त्यांना. आणि म्हणूनच आपण बदलत नाहीयेत. कारण सगळेच शिवाजी घाबरलेत, नव्हे नव्हे घबरवलेत! कारण ते धाडसी झाले तर सरदारक्या कशा चालायच्या? जहागिऱ्या कशा मिळवायच्या?
शिवाजीचे विचार अंगीकरायचे असतील तर हातात घेतलेल्या, नव्हे, दिलेल्या पताका आधी खाली ठेवा आणि लेखणी हातात घ्या. मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाणारे तुम्ही ओळखतच असाल, पण इतिहासातील मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी पुरून-पुरून खाणारे अतिशय कावेबाज असतात. त्यांच्या पासून जपून राहणे तसे अवघडच पण तरी प्रयत्न करा. आऊ जिजाऊ आणि तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद सदैव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेतच!
आपण सगळे हे करू शकलो तर छानच नसता पुढची पिढी आपल्या लेखणी धारदार बनवतेयच.
आजचे मावळे अजूनही
'रस्ते नसणाऱ्या रस्त्यांनी' पायपीट करत असले तरीही
घाबरून कुठे तरी दडून बसले तरीही
अगडबंब नेत्यांच्या स्कोर्पिओचे काडी इतकीही किंमत नसलेले ड्रायव्हर आणि रखवालदार असले तरीही
आणि
फक्त 'नरेगा'च्या कामावरच घर धकवत असले तरीही,
मी आज प्रचंड आशावादी आहे.
कारण, मी बघितल्यात परवाच
थंडी आणि अंधाराला कपात त्याच खडकाळ रस्त्यावरून
तुमच्या व्यवस्थेच्या मदतीशिवाय
शाळेत जातांना जिजाऊ!
पुन्हा
एकदा तुम्हा सर्वांना जिजाऊ.
कॉम
कडून
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जीजाऊ. जय शिवराय.
डावूनलोड लेख
No comments:
Post a Comment