कुठं खादीचा कुर्ता-पायजमा घालून हाती तिरंगा घेतलेला, लाल बावटा घेतलेला आग्रही कार्यकर्ता, तर कुठं आज या, तर उद्या दुसऱ्याच सभांची गर्दी वाढवणारा नव्या काळातला व्यावसायिक कार्यकर्ता! कुठं गायब झाला आहे पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष कार्यकर्ता? का संपून गेली आहे नव्या पिढीतली "कार्यकर्ता-वृत्ती'? कार्यकर्ता-वृत्तीचा हा संस्कार जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडं का होऊ शकला नाही हस्तांतरित?
"जिथं भरपूर कार्यकर्ते, तिथं कामाचा सर्वाधिक सपाटा,' हा सामाजिक मंत्र खोटा वाटू लागेल, असे दिवस सार्वजनिक कार्याच्या वाट्याला सध्या आले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, जयंत्या-पुण्यतिथ्यांच्या मिरवणुकीत नाचणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. ती अफाट आहे.
आरतीला, महाप्रसादालाही रांगाच्या रांगा फुललेल्या दिसतील; परंतु कार्यसिद्धीसाठी आवश्यक त्या सतरंजा घालायला कार्यकर्ते मिळण्याचे दिवस आता संपुष्टात असल्याचं दिसतं. "वेळ नाही', "अतिव्यग्रता' ही कारणं यामागं असतील, असं म्हणावं तर सतरंजा घातल्यावर वा स्टेजवर माईक-खुर्च्या ठेवल्यावर त्यांवर आसनस्थ होणारे, फर्डा भाषणं करणारे, फोटोसाठी पोज देणारे, व्हिडिओग्राफरकडे तिरकी नजर ठेवत टाळ्या टिपणारेही जागोजाग भेटतात. विषयाची आवड आहे, ज्ञानही बऱ्या प्रमाणात आहे, तर मग अडलं कुठं, असा प्रश्न आपसूक पुढं येतो.
जागोजागी उभारलेल्या वेगवेगळ्या मंडळांमध्ये झाडझुडीला एकतर साठी पार केलेली निवृत्त मंडळी असतात, अथवा 10-12 वर्षांची उत्साही पोरंटोरं तरी! अन् हवीच असतील कुणी तरुण मंडळी, तर त्यांची दिवसागणिक "रोजी' ठरलेली. बरं, अशांना पैसे देऊन बोलावलं, तरी ते काम करणार कामगारासारखं. वेळेवर लक्ष ठेवून. नियोजनाच्या दृष्टीनं त्यांचा उपयोग शून्यच.
प्रत्यक्षात कामाच्या वेळी गायब असलेल्यांना कारण विचाराल, तर "आयोजनाबाबत मीटिंगा सुरू होत्या,' असं ऐटीत सांगतील ही तरुण मंडळी. अंग मोडून काम करणारी कार्यकर्त्याची पिढी आता "हायटेक' झाली आहे. उंटावरून शेळ्या हाकण्यासाठी अधिकाधिक सोई मिळाव्यात म्हणून "इव्हेंट मॅनेजर' नावाची एक टूम अस्तित्वात आली आहे. यांच्या आयोजनामुळं कार्यक्रम देखणा, रेखीव व वेळेच्या व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरतो, हे मान्य; परंतु अशा सार्वजनिक कार्यक्रमांना आलेल्या व्यावसायिक रूपानं कार्यकर्ता हरवतो आहे, हे कुणीच लक्षात घेत नाही. उत्तम कार्यकर्ता कसा? उत्तम कार्यकर्ता कोण? हे समाजशास्त्रात नमूद आहे. स्वामी विवेकानंद आदी विभूतींनीही ते स्पष्ट केलं आहे. चार दशकापूर्वी पु. ल. देशपांडे यांनी "व्यक्ती अन् वल्ली'मध्ये नारायणाचं पात्र रंगवून त्याच्यातली कार्यकर्ता वृत्ती अन् गुण या दोहोंना केवळ सलामच नव्हे; तर साष्टांग दंडवत घालायला लावला होता! परंतु सध्या या कार्यकर्त्यांचं व त्या वृत्तीचं नाव धुळीस मिळेल, असं वातावरण तयार झालं आहे. "मै उस प्रभू का सेवक हूं, जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते है।' असं कार्यकर्त्यावृत्तीचं सार सांगणारी तीर्थक्षेत्रं पुराणकाळातली म्हणून मागं पडली.
पांढरपेशा वर्गाला फारच उमाळा आला, तर वर्षातून एकदा-दोनदा आर्थिक मदतीची गुरुदक्षिणा देऊन व्यक्तिगत जीवनातला "सीएसआर' गुपचूप उरकून टाकायचा. आपण या संस्थेच्या वा संघटनेच्या मुशीतून घडलो, हे कुणाला कळलं, तर ठपका लागण्याची धाकधूक मागं नको, हा त्यामागचा उद्देश! पूर्वी "मी कम्युनिस्ट', "मी पुरोगामी', "मी नवमतवादी', "आम्ही हिंदुत्ववादी,' "आम्ही अहिंसावादी', "आम्ही सशस्त्रसेनेचे प्रशंसक' असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनातही किंतु नसे, की ऐकणाऱ्याच्याही. उलट, दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या विचारांचा, चळवळींचा आदर असे. फार तर विरुद्ध मतवादी विचारसरणी डावी-उजवी करत कार्यपद्धतीबाबत फारकत मानत; परंतु परस्परांच्या कार्यकर्ता-वृत्तीबाबत एकमेकांना आदरभावच होता. "मी या विचारसरणीचा असल्यानं माझं जे नुकसान होईल, ती माझ्या विचारांची मला मोजावी लागणारी किंमत आहे,' असाच त्यामागं अभिमानी विचार असे. मात्र, या किमतीची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात केली, त्या क्षणापासून कार्यकर्ता-वृत्तीचा ऱ्हास होत गेला, हे सत्य नाकारण्यात आता अर्थ नाही. "एकेका सत्यासाठी देता यावेत पंचप्राण,' असं शिकवणारे गुरुजी गेले अन् कार्यक्रमाच्या अखेरीस शाबासकीचा पाठीवरचा हात ठरलेल्या रकमांचं पाकीट देऊ लागला.
सानेगुरुजींच्या एका आवाहनांनं प्रभातफेरीचं वेड घेऊन पहाटेची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी नवे कार्यकर्ते कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटाबरोबर मटणासह ओल्या पार्टीची वाट पाहू लागले. पंढरपूरच्या वारीप्रमाणे दर्शनाची आस घेऊन दिंडीमागं चालणारी पावलं समंजसपणे विविध चळवळींच्या मागं भक्तिभावानं चालत असत. आणीबाणी सोसत प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढणाऱ्यांना तुरुंगवासाचीही भीती नव्हती, की पोटापाण्याची चिंताही नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा दीप्ती होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलनांना गर्दी होते. तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशेबानं टाळ्या वाजतात. कार्यक्रमादरम्यान पाण्याचा पाऊच, शिरा-पुरीची पाकिटं हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आलेल्या माणसांच्या झुंडी पुन्हा ट्रकांवर चढतात. कोंबून कोंबून भरलेल्या माणसांनी ट्रक-मेटॅडोर, काळी-पिवळी, जिपा भरभरून निघतात. आजच्या पक्षाची सभा आटोपल्यावर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. कुणाला किती पुऱ्यांची पाकीटं, तर कुणी किती बाटल्या लाटल्या, यावर चढाओढीच्या गप्पा होतात अन् हा हंगामी व्यावसायिक कार्यकर्ता कोणत्या झेंड्यांच्या झुंडीत किती फायदा, यावर सर्रास चर्चा करतो. यामागच्या कारणांचा विचार केला, तर एक मोठा प्रमाद ज्येष्ठ समाजसेवकांकडून घडलेला आहे. कोणत्या तरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचं वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं; परंतु यादरम्यान घडलेल्या लोकनेत्यांनी (नेत्यांनी नव्हे; कारण त्यांच्या वृत्तीची कल्पना आधीच कार्यकर्त्यांना असते) अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग चपला सांभाळणारा ठरला. चळवळीच्या ताई-भाऊंना स्टेशनवर उतरवून घेतल्यापासून त्यांच्या बॅगच्या ओझ्यापासून ते स्टेजवर चढताना त्यांनी काढलेल्या चपला सांभाळण्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांना बहाल करण्यात आली. समाजहितासाठी काढल्या जाणाऱ्या मोर्च्यात लोकनेते म्हणवणाऱ्या म्होरक्यांच्या हातात कधी बॅनर, पत्रक वा हात तुटेपर्यंत व्यवस्थेच्या दृष्टीनं बाळगावी लागणारी "फर्स्ट एड बॉक्स'ची पिशवी कुणी पाहिली आहे का? याउलट या नेत्यांसाठी त्याच बॅगेत पाण्याची पिशवी, बिस्किटं, ग्लुकोजचे पुडे सांभाळण्याचं काम कार्यकर्त्यांना करावं लागतं. सुरवातीला अत्यंत सन्मानाचं वाटणारं हे काम थोड्या काळानंतर रामा गड्याचं होऊन जातं.
मागं मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये खादीचा कुर्ता घातलेला एक तरुण अगदी हिरमुसलेला दिसला. जुनी ओळख असल्यानं चौकशी केल्यावर म्हणाला, ""आत्तापर्यंत या ताई किंवा त्या दादांबरोबर दिल्लीत होतो. आंदोलनं केली. कार्यकर्त्यांना एकत्र केलं, फुटपाथवर झोपलो, पावावर दिवस काढले, आंदोलनाच्या कैफात तब्येतीकडं दुर्लक्ष झालं अन् आजारी पडलो. त्या वेळी ताई-दादांनीही मदत केली नाही की इतर कार्यकर्त्यांनीही. घरी गेलो तर घरच्यांनीही फटकारलं. खूप खर्च झाला, चळवळीतलं पद गेलं. माझी जबाबदारी अन्य कुणाला दिली गेली. ''
चळवळी ध्येय्यवादी असल्या तरी त्यांना अशा अशक्त कार्यकर्त्याची गरज नाही. बरं, बाहेर जाऊन चारचौघांसारखं काम करावं म्हटलं, तर याच्या डोक्यात नेतेगिरी भरल्याचं कळलं असल्यानं कुणी साधं दुकानावरही त्याला कामाला ठेवत नाही. अन्य कामगारांना घेऊन तो बंडाचा झेंडा उगारेल, अशी भीती सगळ्यांना वाटते. तळागाळातल्या कार्यकर्त्यांमधून नेते निर्माण होण्याचे दिवस संपले आहेत; पण अंगात अन् डोक्यात समाजकारण, मानवाधिकार असे एक ना अनेक विचार असल्यानं सामान्यांसारखं जगणं शक्य होत नसल्यानं या कार्यकर्त्याची अवस्था दीनवाणी झाली आहे.
याउलट, रात्रंदिवस एक करून काम करणारा कार्यकर्ता पायाला चाकं लावून समाजसेवा करतो. यात समाजविज्ञानाचं शिक्षण घेऊन सर्वार्थानं व्यावसायिक समाजकार्यकर्ता असेल, तर त्याला फारसा त्रास नाही. स्वतःही नोकरी करत व्यावसायिक समाजकार्यकर्त्यांची भूमिका तो योग्य प्रकारे निभावतो. भाषणाची वेळ आली, की फर्डा भाषण, संयोजनाचं काम आलं, की कौशल्यपूर्ण संयोजन, उपक्रमातली व्यावसायिक गणितं उत्तमरीत्या पार पाडण्यातही गती असल्यानं "गुणी कॉर्पोरेट समाजसेवक' म्हणून अशांचं नाव होतं.
अशांना देशा-परदेशातल्या अनेक संधी खुणावत असतात. यातही चुकूनमाकून या व्यावसायिक समाजकार्यकर्त्यात कुणी हाडामासाचा कार्यकर्ता असेल, तर त्याला अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं; परंतु व्यावसायिक समाजकार्य शिक्षणाच्या अभ्यासामुळं त्याच्यातला कार्यकर्ता विचारी व संयमी असतो. यापेक्षा वाईट स्थिती तळागाळातला कार्यकर्ता अनुभवतो. त्याला विविध संस्था, संघटना अनुभव अन् भावनातिरेक या जोरावर सामाजिक कार्यात अधिकाधिक ओढताना दिसतात. सुरवातीला आग्रहानं सामाजिक कार्यात ओढल्या गेलेल्यांची फरफट कधी होते, हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. मग प्रचंड मनस्ताप होतो. खाण्या-राहण्याचे वांधे होतात. एकेक आदर्श ढासळताना दिसतात अन् त्या वेळी जे नैराश्य येतं त्यानं संपूर्ण जीवनच हलून जातं. यातून बाहेर पडावं अन् कुटुंबात रमावं, तर आजवर समाजकारणापायी कुटुंबाची हेळसांड झाली असते, त्यामुळं घरदारही त्रासलेलं असतं. अशा वेळी नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी कुटुंबीय सोडत नाहीत. समाजसेवेच्या भुताटकीतून भानावर आलेल्यांना सुनवायची हीच तर संधी त्यांना मिळालेली असते! पोटच्या पोरांच्या तोंडाचा घास ओढून घेऊन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भरवलेल्या कुटुंबप्रमुखाविषयी खदखदणारा राग बायका-पोरं याच वेळी बाहेर काढतात. कार्यकर्ता म्हणून साहेबाच्या मागं मिरवताना, त्यांच्या चपला सांभाळताना घरा-दाराला दिलेलं उघडेपण त्यांच्या आत खदखदत असतं. समाजकार्यामुळं बसलेल्या चटक्यांमुळं होरपळलेलं कुटुंब आता पेटून उठलेलं असतं. अशा वेळी निराश कार्यकर्ता पार खचून जातो. आदर्श म्हणून ज्यांच्याकडं तो बघत असतो, त्यांच्याशी बोलावं तर "व्यक्तिगत बाबी नंतर बोलू,' असं म्हणून गप्पगार बसवलं जातं. अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं तिळातिळानं मरण मात्र नवी पिढी हेरते. यांच्यासारखं निष्काम काम करून काही साधणार नाही, हे ती ओळखते. मग चळवळीतून स्वतःला घडवायचं एक नवं चक्र तयार होतो. पद, अधिकार यांचा गैरवापर सर्रास होतो. चळवळीच्या निधीची अफरातफर, बॅच, बिल्ले, जेवण, पाणी यांतून आर्थिक आवक-जावक मोठ्या थाटात होते. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद मागं टाकलं जातं अन् सुरू होतो नव्या पिढीच्या हिशेबी कार्यकर्त्यांचा खेळ. यात तत्त्व, विचार, आदर्श यांना थारा नसतो की सत्यासाठी प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते शीर्षस्थ नेतृत्वालाही याच रिंगणानं घेरलेलं असतं. "मी'चं रिंगण, "माझं'चं रिंगण, "स्व'चं रिंगण अन् "स्वत्व' निर्माण करण्याचं रिंगण... अशी रिंगणं निर्माण झालेले वा केलेलेच कार्यकर्ते आता सर्वत्र दिसतात.
यातच गेल्या काही वर्षांत शिरकाव झाला आहे स्वयंसेवी संस्थांचा, एनजीओ म्हणजेच नॉन-प्रॉफिट ऑर्गनायझेशन्सचा. समाजसेवेच्या नावाखाली देशी वा परदेशी निधी घेऊन विविध उपक्रम चालवायचे... कुठं मीटिंगा... कुठं आंदोलनं... कुठं चर्चासत्रं; तर अगदीच हल्लाबोल करायचा असल्यास "जेल भरो' आंदोलनं! या साऱ्यांत त्यांना संधीचं सोनं करणारे कार्यकर्तेच हवे असतात. मग कुणा मुरलेल्या व्यावसायिक कार्यकर्त्याला घेऊन इतर सामान्य कार्यकर्त्यांचे विचार चेतवून त्यांना आदर्शवादाची, बदललेल्या समाजरचनेची वा वेळ पडली तर हायटेक कार्यकर्ता होण्याची विविध प्रलोभनं दाखवत कार्यकर्ता-गट तयार केला जातो. या साऱ्यात ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणं यश पदरी पडतं, तर बहुतेकांच्या पदरी निराशाच. वेळ आली तर पुन्हा नवा मुद्दा, नवी संघटना अन् नवा दिवस. हेच पाहत नवी पिढी घडू लागली आहे.
"व्हाइट कॉलर' जनतेची मुलं कधी "कार्यकर्ता' होतच नाहीत. एक तर ती होतात पदाधिकारी वा एकदम मंत्री अन् ते जमणंही शक्य नसेल तर "राजकारणात रस नाही,' असं मोठ्या ऐटीनं त्यांचे माय-बाप सांगतात. आपण राहतो त्या समाजाची दिशा अन् दशा ठरवणाऱ्या बऱ्या-वाईट समाजकारणात रस नाही, मत नाही, या विचारानं खरंतर जुन्या पिढीनं अस्वस्थ व्हायला हवं. "इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के ।
ये देश है तुम्हारा, नेता तुम ही हो कल के...' असं किमान एकदा म्हणत आपल्या मुलांवर संस्कार करण्याची आतातर खरी वेळ आली आहे. रेशीमघडीत सुगंधी कस्तुरीसह आपल्या पूर्वजांनी ठेवलेल्या कार्यकर्ता-वृत्तीचा संस्कारी, सुगंधी ठेवा आता हस्तांतरित करण्याची वेळ आली आहे. 1970 च्या दशकानंतर हळूहळू क्षीण होऊ लागलेल्या कार्यकर्ता-वृत्तीनं विसाव्या शतकात तर मानच टाकली आहे. जोवर जुन्या कार्यकर्ता-वृत्तीचा सुगंधी संस्कार असलेले चार-दोन आदर्श हयातीत उरले आहेत, तोवरच हा वारसा हस्तांतरित करता येईल, "हा असा असावा कार्यकर्ता,' हे दाखवून देता येईल!
सौजन्य: सकाळ

No comments:
Post a Comment