ज्या मातीमध्ये जिजाऊ जन्माला आल्या, ज्या मातीमध्ये सावित्री बाई अखेरपर्यंत झुंजल्या, जिथे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, ताराराणी लढल्या त्याच माती मध्ये आजहि स्त्रीची रोज रोज विटंबना होतांना दिसते आहे. दिल्ली मध्ये घडलेली पाशवी घटना असो कि कुठे लहान चिमुकल्या मुलींवर होणारे अत्याचार असो किंवा आज हि गावामध्ये उघडी नागडी करून फिरवली जाणारी आमची दलित भगिनी असो, वर्षानुवर्षे या स्त्रीची घोर विटंबनाच चालली आहे. काळ बदलला, राहणीमान बदलले, सभोवतालची परिस्थती बदलली पण स्त्रियांच्या बद्दल असलेली भोगवस्तू किंवा मालकी मानणारी हीन मानसिकता अजूनही कुठे तरी कायम आहे आणि याचाच प्रत्यय रोज येतांना दिसतो आहे . खर तर या विश्वात ईश्वरानंतर निर्माणाचा अधिकार कुणाला प्राप्त आहे तर तो या स्त्री ला ! स्त्री म्हणजे निर्माती ! स्वराज्य निर्माणकरते युगपुरुष शिवछत्रपती यांना निर्माण करणारी, घडवणारी माता म्हणजे जिजाऊ. महात्मा फुल्यांना पावलो - पावली साथ देणारी आणि स्त्री शिक्षणाचे बीज ज्यांनी रोवले ती स्त्री म्हणजे सावित्री बाई .
या सावित्री आणि जिजाऊ च्या लेकी आजही बाटवल्या जात आहेत ! काळ बदलला आधी रस्त्यावर अत्याचार व्हायचे आता बंद दारामागे रोज रोज स्त्री वर अन्याय, तो हि स्वकियांकडून ! का आणि किती दिवस ?
हा ढोंगी समाज एकीकडे स्त्री ला शक्तीचे स्वरूप मानतो आणि दुसरीकडे तिच्यावरच बळाचा बापर करतो ! तिच्यावरच वैचारिक, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी लादतो ! खर तर या देशातील जाती - धर्म भेद निर्मूलनाचे कार्य याच महिलांनी आपल्या हातामध्ये घेतले पाहिजे, कारण स्त्री हि कुठल्याही जाती धर्माची असो तिची अवस्था फार काही वेगळी नसते. समानता, आदर आणि अस्तित्वाच्या बाबतीत प्रत्येक जाती-धर्माची स्त्री हि कमनशिबीच.
पण नशिबावर मात करून एक नवनिर्माण करणाऱ्या जिजाऊ सारख्या महान आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाचा वारसा असणाऱ्या या मातीतील स्त्रियांनी आता स्वतः जागे होण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या आणि एकूणच समाजाच्या रक्षणासाठी परत एकदा उभे राहण्याची आज खरी गरज आहे.
नवनिर्माण म्हंटले कि ते एका स्त्रीच्या हातून होणे हे ओघाने आलेच. विस्कटलेल्या सामाजिक परिस्थतीतून स्वतःच्या आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या उत्थानाकरिता आता तुलाच हाती तलवार, लेखणी घ्यावी लागणार आहे.
समाजनिर्मिती मध्ये, निर्णय प्रक्रिये मध्ये , राजकीय व्यवस्थेमध्ये आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मानाचे स्थान मिळवण्यासाठी आता स्त्री नेच उभे राहिले पाहिजे आणि यासाठी याकामी तिला बळकटी देण्याचे कामही प्रत्येक स्त्रीनेच केले . समाजाच्या दूष प्रवृत्ती विरुद्ध लढणाऱ्या स्त्रियांना बळ देण्याचे कार्य तुमच्या हातून घडले पाहिजे.
राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे गुलामगिरी आणि अन्यायावर वर घणाघाती घाव करणारी पहिली ऐतिहासिक स्त्री.
या राष्ट्रामातेच्या जन्मदिनी - स्वतंत्र आणि स्वाभिमानी समाज व्यवस्था निर्माण होवो आणि हे घडवण्यासाठी कधी हि न न ढळणारी दृढ इच्छाशक्ती सर्वांना मिळो हीच प्रार्थना करू.
याच जिजाऊ साहेबांच्या तमाम लेकींना सर्वोपातरी सन्मान मिळवून देण्याचे आणि आणि खंबीर पणे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे कार्य प्रत्येक शिव - शंभू प्रेमींकडून व्हावे,जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून पुन्हा हार्दिक शुभेच्छा!
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय!
जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय जिजाऊ ! जय शिवराय !
जय हिंद! जय महाराष्ट्र!
धन्यवाद!
--कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम www.jijau.com
No comments:
Post a Comment