जातिभेदाच्या विरोधात लढता लढता कधी माणूस 'एखाद्या जातीचा' किंवा 'एखाद्या जातीच्या विरोधातला' होवून जातो हे कळतच नाही. ते खूप चांगल्या प्रकारे सांभाळून जाती निर्मूलनाची चळवळ करायला बाबासाहेबच लागतात.
असेच काहीसे माझे झाल्यासारखे मागील काही दिवसात मला वाटले. एका, डोक्याने शांत, व्यक्तीशी चर्चा केल्यावर माझे मलाच काही दिवसात ते उमगले आणि मग 'युरेकाच'!
गेल्यानेक वर्षांपासून जातीनिर्मुलांच्या चळवळीच्या कधी मधे आणि कधी आजूबाजूला राहून जे बघितले त्याचा बराच परिणाम विचारांवर झाला. सुरवात तर वंचितांचा विकास, ते मग तथाकथित सवर्ण असोत कि तथाकथित अवर्ण, या मुद्द्यापासून झाली. कळायला लागले की जातींच्या उतरंडीमधे वरती असणारांनी उतरंडीतील खालच्यांचे शोषण केले. त्यांना प्रवाहापासून दूर ठेवले. वेळच पडली तर प्रवाहात येणार्यांचे प्रयतन हाणून पडले, पुढच्या पिढ्यांचे वर्चस्व टिकवण्यासाठी. बर हे ही कळाले कि हे सगळे भूतकाळात तर होतेच पण अजूनही आहेत आणि भविष्यात ही आपले अस्तित्व आणि वर्चस्व कसे टिकून राहील यासाठी यांच्या भूमिगत आणि भूमीवर कारवाया चालूच असतात. याचे फारच दुख झाले. त्याही पेक्षा जास्त राग आला. काही अंशी विचार करतांना आणि मांडतांना चुकलोही. पण शिकलोही, याचा आनंद.
आज महाराष्ट्रातील जातीय परिस्थिती ही कधी नव्हती इतकी बिकट आहे. मराठे ब्र्म्हनांच्या विरोधात उभे आहेत, इतर बहुजन मराठ्यांच्या विरोधात उभे आहेत तर दलित ब्राम्हण आणि मराठ्यांच्या विरोधात उभे आहेत; इतर बहुजनांना ते वाट चुकलेले समजून सोडून देतात. सगळीकडेच उघड उघड नसला तरी आप-आपसातील द्वेष सगळीकडेच सळसळतोय. पण यातच या सामाजिक प्रश्नाच्या मड्यावरचे 'आर्थिक' आणि 'राजकीय' लोणी खाण्याचे काम काही लोक करताहेत. मेलेल्या मड्यावरचे लोणी तसेही कुणी वापरत नाही; म्हणून एकवेळी फक्त खाल्ले असते तरी प्रश्न नव्हता. पण अगदीच या प्रश्नात जास्तीत जास्त मडे पडवीत आणि वाटी येणारे लोणी वाढावे म्हणून जे प्रयत्न चाललेत याची सुजानांनी वेळीच दखल घ्यावी.
या प्रश्नांवर खालील काही प्रश्न मला विचारले गेले, काही मी स्वतःला विचारले, उत्तरे शोधली. बरच काही सापडल. कदाचित उपयोगी पडेल म्हणून इथे देत आहे.
अजूनही जातीभेद अस्तीत्वात आहे का?
होय.
अजूनही लग्ने जातीतच होतात. जातीवरून कुणाच्या विचाराला किती मान द्यायचा ते ठरवले जाते. जातीवरून बुद्धिमत्तेचा अंदाज हि बांधला जातो. नौकरीतल्या मुलाखतीत 'हा' चांगले काम करू शकेल की नाही याचा अंदाजच बांधला जात असल्याने बऱ्याच जागेवर हा अंदाज जातीच्या कलेने जातो. तितकेच काय तर डॉक्टरकडे जात्तांनाही अजूनही विशिष्ट जातीचा असल्यास मनात नाराज भावना ठेवणाऱ्यांची कमी नाही.
याचा अनुभव तुम्ही विशिष्ट जातीतील नसाल तर तुम्हाला येईल, कारण लोक खुलके बोलतात. जातीभेद अस्तित्वात आहे यात प्रशनच नाही.
एकदा गलत फ़ैमितुन उतरंडीत मला वरचा समजून उतरंडीत मी जीथाचा आहे त्या जातीबद्दल - 'हे असेच असतात… आपल्या सारख्याने यांच्या पासून दूर राहावे… वगैरे वगैरे' गोष्टी ऐकायला भेटल्या.
दुसऱ्यांदा एका दुसर्या जातीच्या मित्रासोबत मुलगी पाहायला गेलेलो असतांना राजकारणात 'माझ्या जातीच्या' लोकांनी कसे इतर जातींना पिचलेय आणि आता 'यांना' इंगा दाखवायची वेळ आलीये पण आपले लोक संगठीत होत नाहीत हे दु:ख ऐकायला भेटले.
काही जातींना मंदिर बंदी आणि जेवणाच्या पंगतीतली विशिष्ट जागा हे तर जातीभेदाचे खूप विदारक सत्य आहे. समाजाचा भाग म्हणून राहतांना तुम्ही कितीही प्रगती करा पण या जाचक पद्धत्तीत तुमची गय नाही, हीच भावना कायम टाप-डाऊन भरवली जातीये, अजूनही!
प्रश्नांचे मूळ जातीत शोधण्यापेक्षा ते अर्थशास्त्रात सापडेल का?
नाही.
पैशाने 'जात' जात नाही. भलेही तुम्ही आर्थिकरित्या सक्षम व्हा, जातीय उतरंडीत प्रमोशन नाही! जातीचे आणि अर्थव्यवस्थेचे फार छान गणित लावून ठेवलेय. उतरंडीत वर-वर 'जास्तीत जास्त संपती' आपोआप आणि 'कमीत कमी परिश्रम' करून कशी जमेल याची व्यवस्था आहे.
सध्या त्या व्यास्थेला चांगले तडे गेलेत पण जमा झालेल्या संपत्तीचे विकेंद्रीकरण व्हायला खूप वेळ आहे. 'आधीच पैसा असणारांकडे जास्ती पैसा येतो' या नियमाने आर्थिक उतरंडीतही सिक्वेंस जवळपास कायमच आहे.
म्हणूनच बाबासाहेब एकेजागी सांगतात मार्क्स इथे असता तर त्याने आपला लढा आर्थिक मुद्यावर नाही तर सामाजिक मुद्यावर सुरु केला असता.
पण सगळेच तथाकथित उच्चवर्णीय जातीभेद करतात का?
सगळेच नाही. टोप-डाऊन 'बहुतांश' करतात.
उदाहरणच घ्यायचे झाले तर राजकारणात मोठा होणारा खालच्या जातीचा मराठयांना चालत नाही. त्याला पडायला जमलेच तर विरोधकांच्या पायाशी बसतील पण डोक्यावर इतर कुणी येवू देणार नाहीत.
दुसरे उदाहरण माध्यमात दिसेल. त्यातली त्यात प्रिंट मध्ये. कदाचित जुने असेल म्हणून, पण तिथे हे प्रकर्षाने जाणवते. समजा रविवारच्या मुख्य वृत्तपत्रातील लेखक आणि त्यांच्या लिखाणाचे विषय बघा. सगळेच एका जातीतले. आता ही त्यांची चूक की कदाचित सत्यच हे असेल की फक्त एक विशिष्ट जाताच लिहू शकते किंवा चांगले काम करते. ही जर चूक असेल तर ती मग लिहानारांची किंवा ते चांगले काम करणारांची का? तर नाही, ती फक्त त्यांनाच प्रसिद्धी देनारांची.
पण काही लोक असेही आहेत की ज्यांना जात हा मुद्दाच नाही.
मग उत्तर काय?
जात बाजूल ठेवून निर्णय घेणारी व्यवस्था. जातिभेदाला वाव असेल तेथे लक्ष ठेवणारी आणि तो होऊ नये म्हणून दक्षता घेणारी व्यवस्था. शहरीकरण. चांगले आयुष्य न गमावता, लोकांचे विस्थापन. शिक्षण आणि मानवी मूल्यांच्या शिक्षणावर भर.
आरक्षणाने जातीभेद वाढतोय का?
नाही. या कारणाने जातीभेद कारणांच्या भीतीनेच आरक्षण ठेवावे लागतेय.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे का?
होय. पण त्यात क्रिमी लेयर ची मर्यादा असावी.
मराठा समाज हा महाराष्ट्रातील संख्येने सगळ्यात मोठा असलेला समाज आहे. मुख्यतः शेती हा व्यवसाय असल्याने आणि वडिलोपार्जित या संकल्पनेच्या अतिशय आहारी गेल्याने नव्या प्रवाहात सामील व्हायला याला वेळ लागला. मराठ्यान सोबत तसे पाहिल्यास जातीय भेद होत नाही. पण अ-राजकीय शासन व्यवस्थेतला सहभाग संखेच्या मानाने कमी आहे.
अगदीच साध्या भाषेत म्हणायचे झाल्यास मराठ्यांना नौकार्यांना लावा म्हणजे ते राजकारण सोडतील! संखेने जास्त असल्याने नौकरी वाल्या मराठ्यांच्या पुढच्या पिढ्या ग्रामीण व्यवस्था, आणि मुख्यतः त्यातली जातीय व्यवस्था विसरतील यात शंकाच नाही. पण हे आरक्षण फक्त नौकऱ्या आणि शिक्षणात असावे नसता, अरेरावी मजल्या शिवाय राहणार नाही!
खुल्या वर्गातील आर्थिक मागासांचे काय?
शिष्यवृत्या. हा त्यावरील सगळ्यात चांगला पर्याय आहे.
या सगळ्या आणि अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे शोधताना जाती निर्मुलन येत्या काही दशकात शक्य आहे असे वाटते. पण जातीय चळवळी जातीनिर्मुलानाचा रस्ता भटकून जाती द्वेषाच्या रस्त्याने गेल्या नाही तरच!
-
प्रकाश बा. पिंपळे