[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४]
स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू.
स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग.
त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते.
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचायला लागला.
राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.
आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन.
जय जिजाऊ.
आपलेच,
कार्यकर्ते, जिजाऊ.कॉम
www.jijau.com
No comments:
Post a Comment