राज कि उद्धव ? काही वर्षांपूर्वी अनेकांना हा प्रश्न पडलेला.. कारण होते मराठी माणसाने आपले रक्त सांडून उभ्या केलेल्या संघटनेच्या भवितव्याचे !
दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले, परंतु वर्तमान परिस्थिती मध्ये शिवसेनेची चाललेली पीछेहाट पाहून परत हाच प्रश्न मनात रेंगाळतो !
अतिशय निष्क्रिय सरकार, घोटाळे, भ्रष्टाचार, गुंडगिरी, आघाडी मधील भांडणे हे सर्व काही राजरोस पणे सुरु असतांना हि महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची चाललेली वाताहत खरच बघवत नाहीये, विशेषतः शिवसेनेची.
मुंबई आणि ठाणे इथे अगदी काठावरती पास होऊन विजय सोहळे साजरे करणारे कार्याध्यक्ष महाराष्ट्रामध्ये झालेल्या मिनी विधानसभेच्या म्हणजेच सर्व जिल्हा परिषदांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमधील आपला पराजय का लपवत फिरत आहेत? मुंबई - ठाणे वगळता इतर कुठल्याच महानगर पालिकांमध्ये सेनेची काय परिस्थिती आहे? न शहरी न ग्रामीण कुठे तरी प्रभाव राहिलंय का ?
महाराष्ट्रासाठी सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थती असली तरी विरोधी पक्ष म्हणून सेनेसाठी ती अत्यंत अनुकूल अशीच आहे, पण त्याचा किती फायदा ह्यांना घेता येतो ? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कुठाय सेनेचे अस्तित्व? खडसे, फडणवीस आणि आता तावडे .. अहो ह्यांचे सैनिक काय करत आहेत ? जैतापूर चे राजकारण .. बर त्यातूनही फलनिष्पत्ती काय .. शून्यच.
असंख्य समस्यांनी ग्रासलेल्या समाजाचे प्रश्न घेऊन एक उग्र आंदोलन उभे केल्याचे गेल्या कित्येक दिवसात ऐकिवात पण नाही, हां पण ठरवून केलेले आणि फसलेले आंदोलने मात्र बघायला मिळाली.
देश पातळीवर कॉंग्रेस- भाजप ला कंटाळलेली जनता प्रादेशिक पातळीवर सेनेकडून खूप अपेक्षा ठेवून होती, पण नेहमीप्रमाणे अपेक्षाभंगाशिवाय त्यांच्या वाट्याला काही हि आले नाही.
मनसे धीम्या गतीने का होईना पण वाढत आहे पण त्यांना हि खूप मर्यादा आहेत हे हि समोर आले आहे , पण सेनेमुळे निर्माण झालेली पोकळी आता राष्ट्रवादी कॉंग्रेस भरून काढत आहे. सामान्य - मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी च्या पाठीशी उभा आहे हे गेल्या काही निवडणुकांमध्ये दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणूक कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होत आहे आणि इथेच कुठे तरी हि धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष कमकुवत आहे हे काही लपून राहिलेले नाही, महाराष्ट्राच्या प्रश्नावर त्यांच्या मध्ये एकी नाहीये कारण तेवढी प्रगल्भता सेनेकडे उरली नाहीये. विधिमंडळात मनसेला एकाकी पडायचे, भाजपला किंमत द्यायची नाही यामुळे सबंध विरोधी पक्षामध्येच ताटातूट निर्माण झालीये आणि याच फायदा सत्ताधारी घेत आहेत.
एकीकडे धोरण शून्य कारभार चालू असतांना सेनेची चाललेली हि वाताहत खरच गांभीर्याने विचार करण्याजोगीच आहे.
४० वर्षे मेहनतीने उभारलेली एक संघटना आज सशक्त हातामध्ये नसल्यामुळे ह्या परिस्थिती मध्ये आली आहे. मनापासून दुखः होते !
आणि परत मनातील प्रश्न अजून अधोरेखित होतो, खरच बाळासाहेब चुकले का ?
अमोल सुरोशे (नांदापूरकर)
टीप : माझा कुठल्याही राजकीय संघटनेशी सबंध नाहीये, फ़क़्त महाराष्ट्राचा एक मराठी माणूस म्हणून मनामध्ये आलेले विचार सरळ मांडले ! इथे कुठे हि कोणाच्या कर्तृत्वाबद्दल कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचा उद्देश्य नाहीये.
No comments:
Post a Comment