१२ जानेवारी २०१२, राजमाता जिजाऊची, जिजाऊ साहेबांची जयंती. जिजाऊ साहेबांचे विचार नव्या पिढीने वाचावेत आणि समजून घ्यावेत या उद्देशाने जिजाऊ.कॉम ने मानवत, जिल्हा परभणी येथील भाले-पाटील विद्यालयात १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती निमित्य वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेच्या संकल्पनेची आणि संचालनाची मुख्य जबाबदारी जिजाऊ.कॉम चे आणि याच शाळेत अध्यापनाचे काम करणारे ज्ञानेश्वर रेंगे यांनी पार पाडली. शाळेतील प्रत्येक शिक्षकाचा ही यात मोलाचा वाटा आहे.
या शाळेतील ७०% हून ही अधिक विद्यार्थी जवळपासच्या खेड्यातून येतात. प्रत्येक गाव जवळपास ४ की.मी. पेक्षा जास्तच अंतरावर. येण्या जाण्याचे मुख्य साधन सायकल, असेल तर एस.टी नसता मग बरेच जन पायी ही. अशी ही ग्रामीण शाळा. पण नवल करावे इतके तल्लख विद्यार्थी. वक्तृत्व स्पर्धेला ४७ विद्यार्थ्यांनी भाषणे केली आणि अवघा परिसर दुमदुमून टाकला. इतक्या प्रचंड प्रतिसादाचे स्वप्न ही आम्ही पहिले नव्हते. मग काय स्पर्धा दोन दिवस घ्यावी लागली. काही वक्ते आज आणि काही उद्या. काही हाताची घडी घालून तर काही हात वारे करत चिमुकले वक्ते धाड धाड बोलत होते. आणि आवाज फक्त मुलांचाच नव्हे तर चिमुकल्या मुलींचा ही आसमंत दुमदुमून सोडत होता. ह्याच उद्याच्या जिजाऊ आणि हेच उद्याचे शिवबा, हेच चित्र डोळ्या पुढे उभे राहिले. भाषेला ग्रामीण मातीचा गंध आणि रांगडेपणा पण विश्वाच्या कोण्याही प्रश्नावर बोलण्याची तयारी असलेला हा नवा भारतीय समाज पाहून आता विश्व विजय फार दूर नाही हेच वाटले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता - "राजमाता जिजाऊ". तसाच प्रतिसाद निबंध स्पर्धेला ही. विषय ही होतेच तसे बदलत्या आणि मागच्या समाजाचा ठाव घेणारे - आऊ जिजाऊ, स्त्री पुरुष समानता आणि आजच्या काळात आईची गरज, कर्तव्य आणि जबाबदारी. अगदी रुळलेल्या अक्षरातले निबंध प्रत्येक वाक्यातील विचार डोळ्याला विलोभून डोक्याला भांबावून सोडत होते. काही निबंध वाचतांना वाटले काय हे? - आणि फार विचार न करताच मन म्हंटले "ग्रामीण सोने अन अजून काय!"
या दोन्ही स्पर्धेतील सगळ्यात जास्त प्रभावित केलेल्या भाषणांना आणि निबंधांना पारितोषिके देण्यात आली. पण त्या प्रत्येक छोट्या विचारवंताला सलाम. २६ जानेवारी २०१२ रोजी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. शाळेच्या स्वच्छ धुतलेल्या गणवेशातले विद्यार्थिनी आणि विद्यार्थी पाहून आम्हाला ही शाळेतील अशा प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनाची आठवण झाली. दुसरे दिवाळी आणि दसराच हे राष्ट्रीय सण! या कार्यक्रमातच शिवनेरी मित्र मंडळ म्हणून एक संघटन प्रत्येक वर्षी शाळेत अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत असते. त्यांचे ही काम खरच खूप प्रशंसनीय. त्यांना जिजाऊ.कॉम तर्फे खूप धन्यवाद आणि अशा राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी शुभेच्छा.
जिजाऊ.कॉम तर्फे विजेत्यांना प्रमाणपत्र आणि काही शालेय साहित्य बक्षीस देण्यात आले. तसेच शाळेच्या अशा उपक्रमातील हिर-हिरीच्या सहभागा बद्दल शाळेला ही धन्यवाद पत्र देण्यात आले. कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष श्री. भाले-पाटील आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्या साठी मुख्याध्यापक श्री. सुनील दुमाने तसेच इतर शिक्षक आणि शिक्षिका यांनी प्रयत्न केले. श्री. रणजीत भाले, अंकुश टेंगसे, नागनाथ लहाने, अनिल कोकरे, गणेश अतकरे, संजय जगताप, आनंद नांदगावकर, प्रकाश रासवे, रणवीर भाले, किसन भिसे, राहुल खंदारे, नंदकुमार नरवडे, बालाजी सोळंके, श्रीमती. के. बी. राठोड, अंजना कटारे, एन. व्ही. शेख, एम. डी. मडके आणि एम. आर. गाडे या सर्वांचे सहकार्यासाठी विशेष आभार. तसेच के के एम महाविद्यालयातील प्राध्यापक श्री. गुलाब शेख यांनी निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून खूप मोठी काम गिरी केली, त्यांचे ही खूप आभार.
या सर्वांच्या अशा विचार घडवणाऱ्या उपक्रमांना आणि शैक्षणिक चळवळीला जिजाऊ.कॉम च्या हार्दिक शुभेच्छा!
1 comment:
खूपच छान माहिती thank you for sharing हे पण वाचा > राजमाता जिजाऊ अप्रतिम भाषण निबंध मराठी माहिती !
Post a Comment