निवडणुकांचे ढग दाटू लागलेत, आता पैश्यांचा पाऊस पडणार. गावोगावी दारूचा महापूर येणार.. सर्वत्र नोटांची हिरवळ असेल आणि परत एकदा मौसमी बेडक डराव - डराव करीत आप आपल्या बिळातून बाहेर पडतील.
आपल्या कडे कोणाला जर विचारले ' तुझा आवडता ऋतू कुठला रे' ? तर १० पैकी ९ जन सांगतील पावसाळा त्याच प्रमाणे आपल्या भारतीयांचा अजून एक आवडता ऋतू म्हणजे निवडणुकांचा काळ. रोज रोज त्या डेली सोप मालिका बघून कंटाळा येतो, अंतर राष्ट्रीय क्रिकेट एखाद्या गल्ली क्रिकेट सारखा रोजच खेळला जातंय, २४ तास न्यूज चैनल वाल्यांच्या अतिरेकी ब्रेकिंग न्यूज मुळेही डोक गरगरून जांत. अशावेळी या सर्वातून घात्काभाराची करमणूक म्हणजे निवडणुकांचा काळ.
तुम्ही म्हणाल लोकशाहीतील सर्वात कसोटीचा प्रसंग म्हणजे निवडणुका आणि मी त्याला करमणूक म्हणतोय, ज्या उदात्त हेतूने लोकशाहीची स्थापना आपल्या थोर नेत्यांनी करून ठेवली ती अभिप्रेत लोकशाही खरच आपण रोज अनुभवतो का? कधी कधी हा सगळाच प्रकार करमणुकीचा वाटायला लागतो आणि आपण त्याचे प्रेक्षक. लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणजे "आपण लोकच" जर प्रेक्षक म्हणून बसलो तर मग इतरांना आपली करमणूक केल्याखेरीज पर्याय तरी काय उरतो.
सध्या झेड पी आणि महापालिकांच्या निवडणुका आल्या आहेत. साठ वर्षांची गोळा बेरीज केली तर एकीकडे स्वतःला भविष्यातली जागतिक महासत्ता वैगेरे म्हणवून घ्यायचा आणि दुसरीकडे दिवसोंदिवस गावं भकास आणि शहरे बकाल होत असतांना उघड्या डोळ्यांनी बघायचे. लोक म्हणतात आमच्या अपेक्षा खूपच साध्या आहेत हो, अगदी रोजच्या जगण्याच्या काही अडचणी आहेत. तुमच्या आमच्या रोजच्या प्रश्नांवर समाधान देणारी यंत्रणा म्हणजेच झेड पी आणि महानगर पालिका. खर तर इथे फ़क़्त विकासाची गोष्ट व्हायला हवी, तुमच्या प्रश्नांवर राजकीय पक्षांच्या भूमिका समोर याव्यात, रोजच्या प्रश्नाचे उत्तर कोण देतो हे आपण पहिले पाहिजे. पण प्रत्यक्षात काय होतांना दिसत आहे, गावं असो वा शहर नेत्यांनी दाखवलेल्या दीड पैश्याच्या अमिषाला, त्यांच्या लोकल गुंडा गर्दीला आपण बळी पडतो. एरवी देश सुधारण्याच्या गप्पा (फेसबुक वर) करणार्यांसाठी हि तर एक चिल्लर निवडणूक म्हणून त्यासाठी त्यांना वेळच नसतो आणि फारसे स्वारस्य हि नसते आणि ज्यांना वेळ असतो ते मागचे सर्व काही विसरून आपला काही स्वार्थ साध्य करण्यासाठी यात सहभाग नोंदवितो.
अगोदर म्हणायचे गावाकडे - झोपड पट्टी मध्ये खूप पैसा वाटला जातो, दारू वाटली जाते पण आता तर चांगल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये देखील वेगळ्या प्रकारे अनैतिक मार्गांचा वापर केला जातोय. केबल चे पैसे भरणे, सोसायटीमध्ये बोअर पाडून घेणे, महिलांसाठी छान अशी फाईव स्टार पिकनिक काढणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थ स्थळांच्या वाऱ्या घडवून आणणे, मंदिर बांधून घेणे हे सर्व अगदी उघड पणे सुरु असते आणि आपण त्याचे मूक साक्षीदार देखील असतो.
या सर्वांचा कळस या धुमधामी म्हणजे साड्या बदलाव्या तस लोक पक्ष बदलत असतात, निवडणुकीचे तिकीट नाकारल्या नंतरच या सर्वांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची जाण होते, कधी हि न आठवलेले विकासाचे प्रश्न आठवतात, विठ्ठल आठवतो, जनता आठवते.. पण हे सर्व होतांना आपण मात्र सर्व काही विसरतो. पक्ष बदलला म्हणून त्याला मतदान करू नये अस मी म्हणत नाहीये पण तो माणूस किती बदलला हे आपण तपासणार आहोत कि नाही? त्याची इतिहास - भूगोल कसा बदलला ? रस्त्यांवर रोज दिसणारा नेता कधी काळ्या काचांच्या अलिशान गाड्यांमध्ये गायब झाला ? दिवसभर कट्ट्यावर बोलणार्यांना आज त्यांच्या बंगल्यात सुद्धा भेटायला वेळ नसतो, चार आठ तरुण पोर जवळ करायची आणि स्वतः किती कार्य सम्राट असल्याचा आंव आणायचा. आपल्या भागाच्या विकासापेक्षा यांचे झालेले विकास आपल्याला का दिसत नाहीत?
दोस्त हो, निवडणुकांचा हा खेळ वर्षानुवर्षे असाच चालत आलाय याला कारण म्हणजे त्याला लाभलेला प्रेक्षक वर्ग. तो कधीच बदलला नाही त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोन्ही हि कायम तसाच राहून चाललंय. गेलेले वर्ष बऱ्याच क्रांत्यांनी गाजलेले, लोक थोड्या काळासाठी का होईना जागे झालेले आम्ही पहिले. प्रामाणिक इच्छा ठेवून, आपले दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी आपला दृष्टीकोन बदला नक्कीच येणारा काळ बदलाकडे पहिले पाउल घेऊन जाणारच असेल याची मला खात्री आहे.
लोकशाहीच्या या निवडणुकी सणामध्ये तुम्ही सर्वांनी हिरारीने सहभाग घ्यावा, स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच शोधा. केवळ बघ्याची भूमिका घेऊन प्रश्न सुटणार नाहीत.
संधी चालून आलेली आहे, आपली गल्ली सुधारा.. दिल्ली सुधारायला वेळ लागणार नाही.
जय महाराष्ट्र.
अमोल सुरोशे (नांदापूरकर)
No comments:
Post a Comment