Sunday, August 28, 2011

विजय अण्णांचा .. विजय लोकशाहीचा !

जगातील सर्वात मोठी लोकशाही, गेली कित्येक वर्षे शुभ्र कपडे घातलेल्या काही गुंडांच्या हातामध्ये आणि प्रचंड पैश्याच्या दलदलीमध्ये फसलेली होती . या लोकशाहीचे धडे आम्ही अगदी शाळेपासून शिकत आलो, स्वातंत्र्य - समता -बंधुत्व हे पुस्तकातील शब्द अपवादानेच बाहेरच्या जगात बघायला मिळायचे, राजेशाही गेली आणि लोकशाही आली असेच वाटायचे कारण पहिले राजघराणे राज्य करायचे आणि नंतर राजकीय घराणे राज्य करू लागले. मोठे घराणे, प्रचंड पैसा, मुबलक मनुष्यबळ आणि आपल्या दादागिरीने समाज मनावर असलेली दहशत यामुळे खऱ्या लोकशाहीची फळे कित्येक वर्षे चाखायला मिळालीच नव्हती. नाही म्हणता निवडणुकीपुरता आमचा मतदार हा मतदार राजा बनायचा पण हाच राजा पुढील पाच वर्षे याच पुढाऱ्यांच्या दारावर चपला घासत फिरायचा.

निवडणुकांना युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले, साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग सर्रास होऊ लागला, या मध्ये रोजीरोटी साठी धडपडत असणारा आमचा सामान्य भारतीय नागरिक बिचारा होरपळून निघाला. मध्यमवर्गीयांनी नेहमीप्रमाणे शांत राहणेच पसंत केले आणि गर्भ श्रीमंत लोकांना तर या लोकशाहीशी कधी देनेघेनेच नव्हते. शासन-सरकार त्यांच्या दाराशी उभे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिक आणि भारतीय लोकशाही यांच्या मध्ये फार मोठा दुरावा निर्माण झाला होता.

सुदैवाने जगातील सर्वात जास्त तरुण आमच्या या देशामध्ये आहेत पण याच देशाचे दुर्दैव हे कि हा सगळा तरुण वर्ग इथल्या राजकीय व्यवस्थेला कंटाळला, भारत - भारतीय समाज, भारतीय लोकशाही यांपासून तो कित्येक दूर ढकलला गेला, परदेशा मध्ये जाऊन नौकरी करू लागला, इथे काहीच बदलणार नाही या भावनेने इतर देशाची स्तुतिसुमने गाऊ लागला, पण कुठे तरी या देशाविषयीची तळमळ त्याच्या आत होती.. शेवटी तरुणाईची जात ती कित्ती काळ शांत राहणार फ़क़्त एका ठिणगीची गरज होती.

तीच ठिणगी पडली जेव्हा भ्रष्टाचाराने कळस गाठला, महागाई - बेरोजगारी ने होरपळणारा तरुण अण्णा हजारे या ७४ वर्षीय सामान्य भारतीयामागे उभा राहिला. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. राळेगणसिद्धी सारख्या छोट्या खेड्यात राहणारे अण्णा देशाचे दुसरे गांधी बनले आणि एकविसाव्या शतकात गांधींच्या विचारांची टोपी मस्तकावर घेऊन, हाती तिरंगा आणि वंदे मातरम च्या जयघोषात हा तरुण रस्त्यावर आला. या देशातील सर्व रस्ते या तरुणाईने फुलून गेले, कुठेही एकही दगड न फेकता, पूर्ण अहिंसक मार्गाने हे आंदोलन १२ दिवस चालले. सबंध जगासमोर एक आदर्शच निर्माण झाला, गांधी द्वेषाने भरलेली डोकी गांधी टोपी घालून मिरवतानाचा क्षण तर खरोखरच ऐतिहासिक होता. इतिहासात वाचलेली आणि सिनेमात बघितलेली गांधीगिरी सर्वांनी प्रत्यक्ष अनुभवली.

सामान्य माणसांच्या प्रश्नावर उदासीन असणारे सरकार जागे झाले,पण झोपण्याचे सोंग काही केल्या जात नव्हते. कित्येक वर्षांनी लोकशाही ची सूत्रे सामान्य माणसाच्या हाती आली होती. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या द्वारे चालवण्यात येणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही हे लवकरच सर्वांच्या ध्यानी आले, सरकार - विरोधी पक्ष खडबडून जागे झाले, लोकभावनेपुढे सोंगही उतरले.

संसदेमध्ये लोकांचे प्रश्न चर्चेला आले, पहिल्यांदाच तमाम देश डोळे लाऊन संसदेचे कामकाज पाहत होता आणि त्याचा लोकशाहीवरचा विश्वास हि परत जागृत झाला होता. आमचे प्रश्न याच व्यवस्थेतून सोडवले जाऊ शकतात यावर कधी विश्वास न ठेवणारे देखील डोळे फाडून हे सर्व काही पाहत होते, जिवंत लोकशाहीचं उदाहरण सबंध जगासमोर आले. लोकांच्या निगडीत प्रश्नावर संसदेने शिक्कामोर्तब केले आणि लोकशाहीचा विजय झाला.

या आंदोलनाने आमची लोकशाही किंवा घटना कमजोर झाली नसून भरकटलेल्या तरुणाईला परत बाबासाहेबांनी दिलेल्या या घटनात्मक व्यवस्थेकडे नेण्याचे कार्य अण्णांनी केले, गांधींनी दाखवलेला मार्ग केवळ पुस्तकी नसून तो प्रत्य्काशातही कसा यशस्वी होऊ शकतो याचा देमोच आजच्या आमच्या पिढीला मिळाला. आणि लोकशाही मध्ये जो पर्यंत लोकांचा सहभाग नसतो तो पर्यंत त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हे हि पुन्हा ठळकपणे सर्वांसमोर आले त्या बद्दल अण्णा तुमचे कोटी कोटी धन्यवाद.

भारतीयांचा विजय असो.. भारतीय लोकशाहीचा विजय असो !!

अमोल सुरोशे (नांदापूरकर)


No comments:

Post a Comment