एक खूप आनंदाचा क्षण अनुभायाला भेटला काल, तो म्हणजे 'राजमाता जिजाऊ' या चित्रपटाचा प्रीमियर. आऊसाहेबांच्या जीवनावर आधारित असा हा चित्रपट आज दिनांक २० मे २०११ रोजी प्रदर्शित होतोय. योगा योग असा की अगदी याच दिवशी २००८ रोजी जिजाऊ.कॉम चे पहिले पाऊल पडले.
"राजमाता जिजाऊ" हा जिजाऊ साहेबांच्या आयुष्यावर आधारित असा पहिला वहिला चित्रपट आहे. आज या मराठी मातीत आणि मराठी माणसाच्या मनात असणाऱ्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे बीज कधी याच मातेने शिवबा मध्ये रुजवले. या पेरणीचा आणि पुढे स्वराज्याच्या वाढीचा आलेख म्हणजे "राजमाता जिजाऊ" हा चित्रपट.
सुंदर आणि कणखर असा मावळ प्रांत; आणि त्यात तसेच व्यक्तीमत्व असणारी एक आई आपल्या बाळाला स्वातंत्र्याचे धडे देते, त्याच्यात स्वाभिमान, समानता आणि शौर्य अशी मुल्ये रुजवते असे एकंदर कथानक. पण चित्रपट पाहिल्यावर आपण फक्त इतकच नव्हे, तर अजून खूप काही पाहिलंय ही भावना बाहेर घेऊन पडतो. लहाना पासून ते मोठ्यां पर्यंत प्रत्येकाला माझ्यासाठी 'हे' सांगितले जातेय असे वाटते.
चित्रपटातील गाणी तर इतकी अप्रतिम की प्रत्येक गाण्यागाणीस अंगावर रोमांच उभा राहतो. कैलास खेर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन, नंदेश उपम यांनी अप्रतिम अशी गीते गायली आहेत, काही ओळी काळजाला भिडतात तर काही थेट डोक्याला, तर काही थेट आपल्याला घोड्यावर बसवून शिवकाळात घेऊन जातात.
प्राचार्य स्मिता देशमुख (आता आमच्यासाठी आऊसाहेबाच) ह्या जिजाऊ साहेबांच्या भूमिकेत आहेत, तर अमोल कोल्हे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत आहेत. अप्रतिम अशा अभिनयाचा दाखला दोघांनी ही दिलाय. पण ज्या प्रमाणे शिवरायांच्या राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात प्रत्येक मावळ्याचा जसा तितकाच सहभाग होता, तसाच तितकाच कसोशीचा अभिनय इतर कलाकारांनी ही केलाय. अगदी काहीच ठिकाणी बाल कलाकार अजून अप्रतिम असा अभिनय करू शकले असते असे वाटते. पण शिवराय साकारणे तसे मुश्कीलच, नाही का? पण संवाद इतके जबरदस्त आहेत की कुठे कुठे अभिनयातील हे चढ उतार ही दिसतच नाहीत.
चित्रपटात एकापेक्षा एक असे संवाद, फार कमी वेळात जिजाऊ आणि शिव चरित्राबद्दल खूप काही सांगून जातात. बर ते सांगणे फक्त जिजाऊ आणि शिव चारीत्राबाद्दलचेच राहत नाही तर त्या काळचा इतिहास ही सांगून जातात.
चित्रपटातील आम्हाला खूप खूप आवडलेले काही दृश्य म्हणजे, पुण्यातील जमिनीवर चालवलेला सोनेरी नांगर, छत्रपती आणि जिजाऊ याच्यातील अनेक संवाद, शिवबा आणि मावळ्यांचा एकमेकांच्या डोळ्यात पाहून झालेला संवाद, शाहिस्तेखानाचा वध, राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांना दाटून आलेली शिवा काशीद, बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या स्वराज्याच्या कामी आलेल्या स्वराज्याच्या आधार स्थंभांची आठवण आणि अजून काही.
चित्रपटात फक्त जिजाऊ चरित्रच नव्हे तर शिव चरित्र ही पाहिल्यावेळेस इतके त्यांच्या प्रत्येक पैलूसहित चित्र रुपात आपल्या समोर उभे राहते. "हे माझं राज्य नाही, हे रयतेचे किंवा श्रींचे राज्य आहे" म्हणजे काय हे राज्याभिषेकाचे दृश्य पाहिल्यावर कळते.
पूर्ण चित्रपटभर आऊ जिजाऊ आपल्याला खंबीर बनवत जाते, पण शेवटच्या दृश्यात जिजाऊ प्रेमींच्या डोळ्यात अश्रू उभे करून जाते.
चित्रपटाला जिजाऊ.कॉम आणि मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सहकुटुंब (लहानगे आणि स्त्रियांनी तर आवर्जून - आधुनिक जिजाऊ-शिवबा) पहावा असा हा एक मनोरंजन, विचार आणि संस्कार देणारा चित्रपट आहे.
No comments:
Post a Comment