Tuesday, January 11, 2011

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती, १२ जानेवारी २०११

महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
याच आऊसाहेबांची साथ शहाजी राजांना होती, ज्यांनी स्वराज्याच स्वप्न जिजाऊ साहेबांसोबत पाहिलं; जिजाऊनी ते छत्रपतींकडून साकार करून घेतलं.[या वाक्यानं छत्रपती परप्रकाशित होत नाहीत; आणि तो उदेष्य ही नाही. कोणत्याही बाळाच्या यशात त्याच्या आईच्या संस्काराचा सिंहाचा वाटा असतो आणि राजे स्वयंप्रकाशित सूर्य होते, ज्याला सदैव तितक्याच तेजाच्या आईचे मार्गदर्शन लाभले]
स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्राला छत्रपती आणि त्या छत्रपतींना विचार आणि आचार आणि आपल्या भाषेत vision देणार्‍या आऊ जिजाऊचा आज जन्मदिवस. या वेळेस २०११ ची जिजाऊ जयंती म्हणजे संक्रमण स्थितीतील महाराष्ट्राची जिजाऊ जयंती. आज महाराष्ट्र म्हणजे जाती-पतींनी ग्रासलेल राज्य, सामाजिक आणि आर्थिक दरीने ग्रासलेल राज्य, एक दूरदृष्टी नसलेल आणि ती कधी भविष्यात येईल की नाही अशा शंके मधे असलेल राज्य. शेतकरी अजुन ही आत्महत्या करतो आहे, आता तर ते लोन कापसाच्या पिका पासून द्राक्षाच्या पिकापर्यंत आलय. आता, जयंती आणि आनंद-उत्सवाच्या दिवशी असा विषय बोलू नये असे वाटते; पण मग आपलेच डोळे आपण आऊ जिजाऊची आठवण काढली की आपोआप उघडतात. ज्या मातीसाठी आणि मराठी मुलखसाठी जीणे आपल बाळ दिल आणि आपलही आयुष्य त्या मूलखाच्या कल्याणासाठी घालवल अशा आईला जन्मदिनी असो की कधी ही असो हे सगळ पाहून या पेक्षा वेगळ काय वाटेल.

पूर्ण प्रगतीच्या आणि जागतीकरणाच्या उंबरठ्यावर असणारी शहरे आणि त्याच जागतीकरणा पासून कोसो दूर असणारी गावे, खूप अंतर वाढलय-सामाजिक आणि आर्थिक स्थितीत. कुणी जागतिकीकरणामुळे फुलासारख बहरूण निघलाय तर कुणी होरपळून! या आर्थिक प्रक्रियेत हे होणे साहजिक आहे आणि हा एक प्रकारचा नियमच. पण जिथे कशा ही नियमाला न जुमानता लोक-कल्याणकारी सहकार चळवळ उभी राहिली, स्त्री शिक्षणाचे धडे गिरवले गेले, जिथे अखिल मराठा-ब्राम्हण-दलित समाज जाती पतीचा विचार न करता संयुक्त महाराष्ट्रा साठी उभा राहीला. आणि येथेच जातिभेद निर्मुलनासाठी साठी शिंदे, पाटील, जोशी आणि आंबेडकर एकच ध्येय घेऊन खांद्याला खांदा लाऊन लढले, अशा या आमच्या महाराष्ट्राला नजरच लागली म्हणाव लागेल. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे इतके कणखर अनुभव असलेला महाराष्ट्र आज केविलवणा चेहरा घेउन दिल्लीत आणि जगा समोर उभा आहे. का?

पण प्रत्येक सामन्य मराठी माणसाला आणि महराष्ट्राच्या कल्याणाचा विचार करणारा प्रत्येकाला एक विनंती की कुठल्या ही प्रकारच्या जातीय आणि निरर्थक आंदोलनात सहभागी न होता विकासाच्या दृष्टीने म्हत्वाच्या कार्यात सभाग घ्या. आपला इतिहास आपल्या पाठीशी आसणारच आहे, पण मग पुढल्या पिढीसाठी नवा इतिहास निर्माण करायचा की पुन्हा जुन्या इतिहासालाच उगाच उकरुन आणि चघळून त्याचा चोथा करायचा आणि याच चोथ्याचा इतिहास करायचा? मग नवा इतिहास फक्त चोथ्याचाच करायचा असेल तर मग महाराजांना का बदनाम करता? उगाच जिजाऊ साहेबांना का मधे ओढता? बऱ्याच चोथा करण्या लायक गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रात आणि तशाही प्रकारचा बराच इतिहास आहे आपल्याकडे. त्याच्या खोलात आम्ही जाऊ इच्छित नाहीत, पण बघा.

तरुण पिढीला एक कळकळीची विनंती आहे.आपण अस काही तरी करू ज्याने येणारी पिढी आपला अभिमान बळगेल.या जातीच्या विषाने प्रदूषित काळात सुद्धा आमचा बाप आणि माय असं काही तरी वेगळ वागले हे म्हण्याची संधी देऊया त्यांना. सामंजस्य दाखवून, येणार्‍या पिढीसाठी आर्थिक आणि सामाजिक सुबत्ता निर्माण करूयात. उद्या कुणाला ही गरिबीमुळे शिक्षणाला मुकाव लागणार नाही ही परिस्थिती निर्माण करूयात आणि तो किंवा ती शाळेत जायला लागली की त्यांची शाळा दंग्यांमुळे बंद होणार नाही हे ही बघुयात. कदाचित हे आपल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीच एक छोटस का होईना ध्येय असाव.आता हे झाल स्वप्न; पण मग करायच काय? आता आर्थिक सुबत्ता अशीच थोडी येणार? काही म्हणतील सामाजिक सुबतात ही आंदोलने, चळवळी आणि अधिवेशने केल्याशिवाय थोडीच येणार? आर्थिक सुबततेसाठी मेहनत करावीच लागणार आणि ती नेमकी कुठे आणि कशी करायची याचा थोडासा अंदाज आपण बांधू शकतो. सामाजिक सुबत्ते बद्दल सांगायच झाल तर आंदोलने, चळवळी आणि अधिवेशने हे सगळे खरच समाज विचार प्रगल्भ करण्याची माध्यमे आहेत. पण ही सगळी कशासाठी होतात आणि सगळ्यात म्हत्वाच कशा प्रकारे होतात ह्याला खूप महत्व द्यावे.

कधी कधी सांगायला लाज वाटते कारण कुणा अमराठी व्यक्तीला मराठी कळत असेल तर आम्ही किती दयनीय अवस्थेत आहोत हे त्यांना कळेल. पण तरीही सांगितलच पाहिजे- आज काही मराठा आणि ब्राम्हण समाजातील नेत्यांनी खूप लाजिरवाणे प्रकार केलेत. आपल्या राजकीय भवितव्यासाठी साक्षात राजामाता आणि महाराजांना मधे ओढले. असो. पांडुरंग त्याना सुबुद्धी देवो. पण समजूतदार मराठा आणि ब्राम्हण युवकांनो कृपा करून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सुजाण इतिहासकार काय करायचं ते करतील. फक्त ते ठीक करत आहेत की नाही ते पडताळून पहा, उगाच एकमेकांची डोकी फोडत आणि बस जळत बसण्यात काही अर्थ नाही.

जग खूप बदलय, तरुणांच्या भाषेत priorities खूप वेगळ्या झाल्यात. पण त्या बदलेल्या असतानाही मराठी तरुण आपल्या मुळांशी आणि मूलभूत मराठी संस्कारांशी अजुन तरी घट्टा बांधलेला आहे. याचाच खूप अभिमान वाटतो. आपली मुल 'आयटीत' असोत की 'शेतीत' असोत, आईच्या भेटी साठी, गावाच्या माती साठी, शाळेच्या कट्ट्यासाठी आणि बपाच्या आशीर्वादासाठी साठी अजुन ही धावून येतात. अजुन ही “छत्रपती शिवाजी महाराज की....” म्हंटल की “जय.....” चा सूर प्रत्येकाच्या मुखातून निघतो; आणि याचाच काही लोक गैरफायदा ही घेतात. असो. आपल्यातल मराठीपण, मराठा-(या शब्दावर कुणा एका गटाची आधी ही कधी सत्ता नव्हती आणि अजून ही नसावी)-पण असच जपून ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय चा नारा सगळ्या जगात घुमवा आणि जिथे जिथे हे नाव जाईल तिथला अंधकार, दुख, दारीद्र्य आणि वाईट दूर करा. आऊ जिजाऊ या कार्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि आज तर ती नक्की हेच सांगत आसेल आपणा सर्वाना.

आज खूप महत्व आलय दारीद्र्य निर्मूलनाला, म्हणजे या पूर्वी कधी ही नव्हतं इतक. कारण सामाजिक दऱ्या भरून काढायला आर्थिक सुधारणेचा मार्ग खूप सोप्पा आसतो आणि या सुधारणा सगळ्या पर्यंत पोहचवणे म्हणजे दारीद्र्या निर्मूलन. शहरे बदललीत आता गावे ही बदलायचीत आपल्याला. येणाऱ्या बदलाला फक्त पैशाचा रंग नको तर संस्कृतीचा ही असावा, अस काहीतरी करायचय. तर हे कराव लागेल आपल्या सारख्या शिकलेल्या युवकांना. जागाच सगळ ज्ञान एकत्र करून आपल्याला आपल्या अर्थसत्तेचा पाया आधी मजबूत करायचा आहे. आपण शिकालोत आणि आता आपल्या मागे असलेल्या बांधवांना आपण शिकवायचय. जगात घडणारे बदल, ते फ्लॅट होतेय की अजुन गोल होतय की नाहीसच होतय हे त्याना आपण त्यांच्या भाषेत सांगायचय. याने त्यांना कळेल की अर्थार्जनाच्या प्रक्रियेत कुठे बदल करावा लागेल. म्हणजे नेमक कोणता धंदा करायचा नी कसा करायचा हे कळेल त्यांना. आणि जमलतर ते आपणच समजून सांगायचय त्यांना. जमलच आपल्या पैकी कुणाला, तर बिनधास्त जावे त्याने घरी- गावकडे, तालुक्याला, आईच्या हाताची भाकर खावी आणि स्वतःच कराव काहीतरी, रोजगार ही निर्माण होईल आणि कदाचित जास्त पैसा ही मिळेल. आता खरच खूप गरज आहे हे सगळ करण्याची, जमेल त्यांनी आणि जमेल तेंव्हा हे नक्की करावे. कारण तुम्ही नाही गेलात तर मग भांडवलदार येतील तेथे, मोठी दुकाने थाटतील आणि मग आपल्यालाही तिथेच पाठवतील. तेंव्हा ते सांगतील ते कराव लागेल. त्या पेक्षा हे बरं आहे. पण पुन्हा एक सल्ला हा 'एक' मार्ग आहे उत्थानाचा आणि खूप अवघड ही; म्हणून जपून. पण तस पाहिलं तर आधी पेक्षा बराच सोप्पा ही. बघा जमलं तर.

तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग करून, जगाच्या अभ्यासाचा उपयोग करून मिळवलेले जागतिकीकरणाचे ज्ञान, त्यात टिकण्याचे ज्ञान आणि प्रगतीसाठीचे ज्ञान समाजातील तळागळाच्या घटकांपर्यंत घेऊन जायला हवे. आऊ जिजाऊच्या कृपेने तूमच्या सारखे युवक या मतीला मिळालेत; तुमच्या सारखे म्हटलंय कारण या विषयावर काही वाचण्याची इच्छा ही आजकाल संपत चालली आहे.महाराष्ट्र अजूनही रायगडावरील पाताकेसारखा राष्ट्रात फडकू शकतो, तुमच्या सारख्या समजूतदार इच्छाशक्तीने आणि युवकांच्या सुजाण प्रयत्नांनी. म्हणूंच जमेल ते करा, जमेल तेथे करा,झेंड्याखाली राहून करा की झेंड्या बाहेर जाऊन करा, पण काही तरी समाज उपयोगी करा. कारण इथेच आपली येणारी पिढी जगायची आहेत.

पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना त्रिवार वंदन करून, आम्हाला राष्ट्रनिर्मितीचा ध्यास लाव, आम्हाला आणि मुलाबाळांना तर सुखी ठेवच ठेव पण या सुखाला कायम ठेवण्यासाठी एक समाज व्यवस्था निर्माण करायची ताकत दे आणि न ढळणारी दृढ इच्छाशक्ती दे हीच प्रार्थना करू.

जिजाऊ जयंतीच्या जिजाऊ.कॉम कडून हार्दिक शुभेच्छा!

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की......... जय!
जय हिंद! जय महाराष्ट्र!
धन्यवाद!
--कार्यकर्ते
जिजाऊ.कॉम www.jijau.com


जिजाऊ.कॉम हा संकल्प खरंच खूप मोठ्ठा आहे. अवघ्या दोन लोकांच्या ताकतीला ते एक फार मोठ्ठ शिव धनुष्य आहे. तुमच्या सहभागाशिवाय आम्ही अपूर्ण नव्हे तर दुर्बल आहोत. कृपया जिजाऊ.कॉम ला आर्थिक सोडून कोणत्याही प्रकारची मदत करू शकत असाल तर न विचारता करायला लागा. हा समाजासाठीच घेतलेला वसा आहे. त्यात तुमचाही सहभाग हवाच. जिजाऊ.कॉम वर एखादे पान तुम्हाला रिकामे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही काही करू शकता का हे बघा. आता पर्यंत जिजाऊ.कॉम चा वाचक वर्ग खूप मोठ्ठा आहे. भारत भारातून भेटी येतात आणि महाराष्ट्रात आम्ही जिथे जिथे गेलो तेथे ही ग्रामीण युकांपर्यंत जिजाऊ.कॉम गेलीय आणि याच खूप मोठ्ठ श्रेय वाचकांना, म्हणजे तुम्हाला जाते. खूप खूप आभार (तसं आभार माणू नयेत, कारण जिजाऊ.कॉम आमचे नव्हे तर आपले आहे).
जिजाऊ या विषयावर तुमच्याकडे काहीही असेल तर कृपा करून पाठवा, स्वतः लिहा आणि इतरांना ही लिहायला लावा. अजून एक, तरुणांचा खूप चांगला सहभाग आहे, पण आमच्या भगिनी मात्र या बाबतीत बऱ्याच निराश वाटतात, आम्ही अपेक्षा करतो त्यांचा ही समावेश वाढेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तक्रारीही असतील तर पाठवायला विसरू नका.

नोट:.आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कुठल्याही प्रकारे संबंध नाही. आम्हाला घेणे आहे ते फक्त राष्ट्राच्या निर्माणाशी, शेतकऱ्यांशी आणि सामान्य माणसाशी. .आम्हाला कोणत्याही जात, धर्म, राष्ट्र,राज्य, पक्ष, वर्ग [आर्थिक/शिक्षित/अशिक्षित/शहरी/ग्रामीण] चे वावडे नाही!



भेट द्या: www.jijau.com जिजाऊ.कॉम विषयी येथे वाचा. आणि येथे नोंदणी करा.

No comments:

Post a Comment