प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!
राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!
आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?
विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!
कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!
तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.
महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.
।। शिवरायांसी आठवावे।।
जीवित तृणवत मानावे..।
------------------------------
2 comments:
chhan mahitee...
gr8!
Post a Comment