महाराष्ट्रदिन
[१ मे २०१०]
जय जिजाऊ ,
महाराष्ट्राच्या सुवर्णमोहत्सवी वाटचालीनिमित्या सर्व महाराष्ट्रीय बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचे (मराठी मुलखाचे) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना ह्या कार्यात यश यावे म्हणून जीवाच रान करून लढलेले मावळे, त्यांची वाटचाल पुढे तशीच यशस्वी ठेवणारे शंभूराजे आणि या दोघांना ही आपल्या मायेच्या छायेत आणि संस्कारांच्या कुशीत वाढवणारी आऊ -राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या सगळ्यांना आधी प्रणाम. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व मराठी-अमराठी नेते, महाराष्ट्रातील सर्व समाज सुधारक आणि हा संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून बलिदान देणारे सगळे हुतात्मे, या सर्वांना नमन. आज महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी झटणारा कार्यकर्ता, तुम्हा आम्हाला अन्न मिळावे म्हणून राबराब राबणारा अन्नदाता शेतकरी आणि सीमेवर, इथे तुम्ही आम्ही सुरक्षित असावे म्हणून लढणारा प्रत्येक सैनिक आणि अंतर्गत शांतता राखली जावी म्हणून डोळ्यात तेल घालून जागणारे सगळे 'प्रामाणिक' पोलीस, महाराष्ट्राच भविष्य निर्माण करण्यासाठी गावोगावच्या शाळेवर प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारे शिक्षक, महराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी झटणारे सगळे उद्योजक, सांस्कृतिक ठेवा जपणारे सगळे कलावंत, राब राब राबणारा मजूर, नव तंत्रज्ञान निर्माण करण्यसाठी दिन रात मेहनत करणरे तंत्रज्ञ-अभियंते, महाराष्ट्राच्या प्रकृतीची काळजी घेणारे डॉक्टर्स आणि महराष्ट्राच्या अस्तित्वाचा घटक असणारा आणि लोकशाहीचा मुलभूत घटक प्रत्येक नागरिक यांना जिजाऊ.कॉम चा सलाम!संयुक्त महाराष्ट्राच्या अस्तित्वाला ५० वर्षे झाली आणि ही सगळी वर्षे हा सिंहासारखा महाराष्ट्र गर्जून काढत आहे, याचा आपणा सर्वांना अभिमान आहेच. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुरोगामी असणारा हा महाराष्ट्र सगळ्या देशाचा मुकुटमनीच आहे; आणि त्यात कोणत्या ही प्रकारची शंका नाही. जिजाऊ साहेबांनी रोवलेले स्वाभिमानाचे बीज अजून ही ह्या महाराष्ट्रात 'बऱ्याच' जागेवर सशक्त झाड म्हणून उभे आहे. इंग्रजांच्या मुखातून देश निघाला आणि मग राष्ट्राच्या अंतर्गत प्रगतीकडे, प्रत्येक राज्याच्या प्रगतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले; जे अगदी स्वाभाविक आणि योग्य होते. त्यातून विविध नवीन राज्याची निर्मिती झाली, ती करत असतांना राजकीय डावपेच ही झाले, पुढे संघर्ष उद्भवला आणि काही राज्यांच्या निर्मितीला 'पुन्हा-एक-छोटा स्वातंत्र्य प्रपातीसाठीचा लढा' असे स्वरूप आले. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, पश्चिम महराष्ट्र वगैरे मराठी भाषिक प्रदेश मिळून १ मे १९६० रोजी सयुंक्त महाराष्ट्र एका संघर्षातून उभा राहिला! एक पुरोगामी राज्य, छत्रपती शिवाजी महराजांचा वसा जपणारे, संतांची भूमी असणारे, टिळक-गोखलें सारख्या स्वातंत्र्य सैनिकांचे संस्कार असणारे, सावित्रीबाई फुले-महात्माफुले सारख्या कर्मयोग्यांचे विचार जोपासणारे, बाबासाहेबांचा समानतेचा वारसा सांगणारे आणि बाबा आमटे सारख्या कर्मयोग्याचे राज्य अशी आपली ओळख. पुढे आपण सहकारात ठसा उमटवला, शिक्षणात क्रांती केली; मुंबईच्या बरोबरीचे औद्योगिक पुणे उभे केले आणि त्याच पुण्याच्या बरोबरीचे औरंगाबाद-नागपूर उभे केले. आपण स्वतः साठीच आव्हाने निर्माण केली आणि त्यांना पुन्हा पुन्हा यशस्वी मत दिली. अगदी पूर्णतः नाही म्हणता आल तरी बरीच प्रगती आपण 'काही क्षेत्रात' केली. आजचा (१ मे ) दिवस तसा सण आणि आनंदाचा; पण या ५० वर्षात काय चुकले आणि पुढे काय करायचे याचा लेखाजोखा आणि मांडणी करणे म्हत्वाचे; आणि उद्या तुमच्या माझ्या माझ्या पोरांनी 'संयुक्त महाराष्ट्रदिन' साजरा करावा म्हणून आवश्यक!तर मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा म्हणून खूप लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मुंबईची आर्थिक स्थिती तशी चांगली आणि हा भाग बर्यापैकी प्रगत. तीच प्रगती मराठवाडा-विदर्भ आणि महराष्ट्राच्या इतर भागात यावी म्हणून वैधानिक विकास महामंडळे सुरु झाली, आता ही महामंडळे 'ऐतिहासिक-वर्तमान काळात' अस्तित्वात आहेत. ते असो. मराठवाडा आणि विदर्भ हे महाराष्ट्राचे दोन अविकसित भाग, मुख्य व्यवसाय शेती, त्याच्याशी निगडीत जोड धंदे तसे कमीच. पश्चिम महाराष्ट्रात शेती आणि त्याच्याशी निगडीत व्यवसाय छान होतात आणि बाजारपेठेची जवळच असलेली उपलब्धता हा ही एक मुख्य मुद्दा. त्या गोष्टी मराठवाडा-विदर्भात नाहीत. कोकण आणि खांदेशाचे ठीक चालले आहे असे 'दिसते'. तिकडे बेळगावचा प्रश्न भिजत पडला आहे आणि मुंबई-पुण्यात जागेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीकडे काही शास्त्रीय आकडेवारीच्या आधारे पहिले तर असे दिसते की उद्या आपली सध्याची छोटी शहरे रोजगाराचा प्रश्न सोडणार आहेत, कारण ते आजच्या मुंबई आणि पुणे यांच्या सारखे होणार आहेत; म्हणजे सरळ सरळ उद्या तेथे ही जागेचा आणि महागाईचा प्रश्न! प्रश्न पाठ सोडणार नाहीये, त्याच स्वरूप बदलणार आहे. म्हणून आपण अवलंबत असलेले प्रगतीचे विविध मार्ग आपल्याला पुन्हा एकदा तपासून पहावे लागणार आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, मुलभूत गरजांचा प्रश्न, जातीय वादाचा प्रश्न आणि अनेक सामजिक प्रश्न; अशी प्रश्नांची यादीच महाराष्ट्रासमोर उभी आहे. यातील बरेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय आणि ते थोडे फार सुटत ही आहेत पण बरेच अजूनच बिकट आणि क्रूर होत आहेत. तस पाहता ५० वर्षे गेली असतांना विदर्भाला वेगळे राज्य घोषित करा ही मागणी व्हावी हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, कारण अशा मागणीला 'काही' लोकांना 'काही कारणे' मिळवीत आणि त्यात ही त्यांना ही मागणी करण्याची, इतकी वर्षे तिथेच सत्ता केल्यावर, हिम्मत व्हावी हेच घृणास्पद. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात आमची १२ घरे, सगळ्यांची पैशासाठी ओढाताण आणि पैसा कशा साठी तर जनतेच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. सगळेच राजकारणी तसे/भ्रष्ट नसतात; पण बहुतांशांनी हे लेबेल राजकारणी या शब्दाला लावून घेतले. ५० वर्षात अब्जावधी रुपये खर्चून आणि भले मोठे कर्ज घेऊन आम्हाला सर्व समावेशक प्रगती साधता आलेली नाही. ह्याच कारणाने पूर्णतः नव्हे पण बहुतांशी आम्ही 'अपयशी' या प्रकारातच आपण मोडतो!
आम्ही काहीही निगेटिव बोलत नाहीत; फक्त सत्य बोलत आहोत. मागे जिजाऊ.कॉम ने मराठीच्या मुद्द्याबद्दल एक ऑन-लाईन सर्वे घेतला ८०% लोकांना कोणत्याही वादात पडायचे नाही त्यांना हवाय तो फक्त प्रगत महाराष्ट्र, पोटाला भाकर, पोरांना शिक्षण आणि घराला सुरक्षा. या पेक्षा कुणाला जास्त अपेक्षा नाहीत आणि इतक्या असणे ही रास्त. हिंसेने आणि पैशाने गढूळ झालेले राजकारण आम्हाला ५० वर्षात बरेच मागे घेऊन गेले. पक्ष कोणता ही असो सत्तेच्या पलीकडे कुणाला जनहित आणि राष्ट्रहित दिसले नाही. आधी सत्ता आणि ती टिकली तर मगच स्वहित आणि त्यानंतर जनहित हेच आजचे सूत्र. राजकारण आणि राज्य इतकं होरपळलेल नाही असा कुणाचा विश्वास असेल तर कृपया ग्रामीण महाराष्ट्र जाऊन बघावा. चार शहरांमध्ये वीज, पाणी आणि नोकऱ्या आल्या म्हणजे महाराष्ट्र प्रगत झालं, असे नाही! आणि त्या चार शहरांच्या तरी सगळ्या गरजा तुम्ही पूर्ण करू शकत आहात का? हा राजकारण्यांना (सत्ताधारी आणि विरोधक सगळ्यांना) प्रश्न! कर्जाचा डोंगर डोक्याच्या वर गेला, खर्च ही झाला आणि महाराष्ट्र जीथच्या तिथे (उठ-सूट मुंबई-पुण्याच्या प्रगतीचे उदाहरण देऊ नका, आणि द्यायचेच असेल तर झोपड पट्ट्यासहित, ट्राफिक सहित आणि आरोग्याच्या अ-सुविधे सहित द्या). कोणतेही शासकीय पत्रक किंवा अहवाल बघा सगळ काही सुखा-सुखी चालले असेच चित्र! मग ओरडणारे काय .... आहेत? महाराष्ट्राला आम्ही मुकुटमनी म्हटलंय पण कारण आपण पुढे गेले हे नाही, तर देशात सुद्धा 'अजूनतरी' कुणीही पुढे आले नाही हे आहे; वासरात लंगडी गाय शहाणी! अजून ही गाव-गावातील 'गावापासून वेगळ्या' दलित वस्त्या पहिल्या की बाबासाहेबांच्या नावाने पक्ष चालवणाऱ्यांची आणि आमच्या पायतानाची भेट व्हावी असे वाटते. याचा दोष नागरिकांना देवू नका, शासन आज काय करत आहे आणि आजपर्यंत काय करत होते? एका दिवसात क्रांती होत नाही हे ही मान्य पण ५० वर्षे झाली हे ही लक्षात ठेवा! आपण सगळे नागरिक आपापल्या संसारात गुंतलेले मतदान करून ह्यांच्या हातात राज्य दिले, पुढे आपण निश्चिंत आणि हे बेफिकीर.सत्ताधारी ही बेफिकीर आणि विरोधक ही; कारण महाराष्ट्राने सध्या राजकारणात असलेल्या सगळ्यांना सत्ता दिली, काय क्रांती झाली? फार दूरची गोष्ट नाही काही वर्षांपूर्वीच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात दस्तूर खुद्द छत्रपतींच्या राज्यात, बाबासाहेबांच्या राज्यात दलितांचे जातीवादातून बळी जातात. ह्याच राज्यात रामदास वी. तुकाराम उभे केले जातात, शिवाजी वी. बाबासाहेब उभे केले जातात, घराचे कमी पडतात म्हणून मग गांधी वी. गोडसे उभे केले जातात. का? कारण फक्त - राजकारण -> सत्ता आणि मग पैसा! अजून ही जातीची पाळली जाणारी कुंपणे आणि कळपा-कळपाने राहण्याची आमची सवय अजून ही आम्हाला सामाजिक समतेच्या अपयशाची धनीच म्हनावतेय. सामाजिक बदल हवाच आहे!
गावागावात झेडपी च्या शाळा पोहचल्या, शिक्षण ही पोहचले आणि आता शिक्षणाचा प्रश्न सुटला असेच वाटले. मग आम्ही सगळेच नागरीक आणि म्हणून शासन, बिनधास्त. पण वैश्विकरणात फक्त शिक्षित आहे असे म्हणून नाही चालत हे आमच्या 'जवळपास-अशिक्षित' राजकारण्यांना नाही कळाले. मतदान करणाऱ्या जनतेला (ग्रामीण) ते कळायला हवे ही अपेक्षा ठेवणेही मूर्खता ठरेल. शहरात ज्यांना कळाले त्यांच्या येणाऱ्या पिढ्या वैशिविकीकरणासाठी तयार झाल्या. उर्वरित महाराष्ट्रात अभियांत्रिकी महाविद्यालये आली, वैद्यकीय महाविद्यालये आली म्हणजे तिथे सगळे 'तेथीलच' लोक शिकले असे नाही; आणि काही शिकले तरी त्यांच्या दर्जा बद्दल शंकाच! चूक त्यांचीही नाहीच. शिक्षण संस्थांचा व्यापार थाटून पालकांच्या मेहनतीचा पैसा खिशात घालून सुस्त झालेले 'शिक्षण-व्यावसायिक' आपल्याच शिक्षण संस्थातून दिल्या जाणऱ्या शिक्षणाच्या दर्जा बद्दल ही उदासीनच राहिले. त्याचे परिणाम त्यांना नव्हे तर विद्यार्थ्यांना भोगावे लागले. गल्लेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या खाऱ्या, पण पण ती शिक्षण व्यवस्थेची 'खरी' देण नव्हे तर बाजारातील वाढलेल्या मागणीची आहे. उद्या तुमच्या ह्या आय.टी कंपन्या बंद झाल्या तर तरुणाकडे असे कोणते कौशल्य आहे जे त्यांना तारेल? तसं आय. टी कंपन्या बंद होणार नाहीत हे खरे, पण या क्षेत्रातील रोजगार निर्मितीची गती कमी होणार हे नक्की. मग आम्ही बांधलाय का अंदाज की कोणत्या क्षेत्रात रोजगार निर्मिती होणार आहे ते किंवा अजून रोजगार निर्मिती साठी काय केले जावे? उगाच कागदो-पत्री अवहाल नको आहेत, ठोस काही केलेय का राज्याने? पुण्यात आणि मुंबईत खूप लघु उद्योग (त्यात आय.टी ही आले) उभे राहत आहेत त्यात महाराष्ट्रीय किती? हा प्रश्न फक्त भांडवल उपलब्धीचा नाही, तो तुमच्या शिक्षण व्यवस्थेत उद्योजकीय-संस्कार किती प्रमाणात आहेत याचा आहे. उगाच नावाला ई.डी.सी. ची उभारणी करू कितीक पैसा आम्ही असाच वाया घालवला. प्राथमिक शिक्षणा पासून ते उच्च-शिक्षणा पर्यंत हीच वाट. पैसा असेल तर शिका हा नियम. "सर, या वेळेस फीस भरायला पैसे नाहीत, उशिरा भरले तर चालतील का?" असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला-शेतकऱ्याच्या मुलाला "मग शिकता कशाला रे?" असा प्रती प्रश्न विचारणारे प्राचार्य 'तयार झालेत' आणि तेही याच शिक्षण क्रांतीच्या माहेरघरात, सुवर्ण मोह्त्सावी महाराष्ट्रात! एकीकडे भरमसाठ वाढलेली फी, घटलेले उत्पन्न आणि अगदी शेतकरी संबंधी अ-सहकार पुकारलेल्या राष्ट्रीयकृत-बँका-सुद्धा मिळून शोषण करत आहेत ही परिस्थिती. "एका विद्यार्थ्याशी असे घडले म्हणजे सगळी व्यवस्थाच अशी आहे असे म्हणे योग्य नाही" अस कुणी म्हणत असेल तर कृपया कृपया त्यांनी हा लेख पुढे वाचूही नये. देशाचा मुलभूत घटक नागरिक तसाच शिक्षण व्यवस्थेचा विद्यार्थी! शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतीची बनावटी सांखिकी एक-मेकांना दाखवून या महाराष्ट्रात एक मेकांची पाठ थोपटण्याचे काम चालू आहे असे सरळ सरळ दिसते. मराठी शाळांना मंजुरी मिळत नाही आणि त्याच मराठीच्या मुद्यावर निवडणुका लढल्या जातात आणि नागरिकांसाठी लाजिरवाणी गोष्ट ही की त्या जिंकल्या ही जातात; मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रात ही! सगळ्या पक्षातील जेष्ठ नेते आणि काही प्रामाणिक कार्यकर्ते सोडले तर पैसा आणि त्या साठी सत्ता हेच समीकरण जीवनाचे ध्येय सगळ्यांनी ठरवलेले दिसते. तसे लोक प्रतिनिधीचे काम सोपे नसते आणि हीच मंडळी इथे जितकं डोकं लावतात तितकं डोकं व्यवसायात लावतील तर आज अंबानी आणि टाटा यांच्या शेजारी बसणारे बरेच मराठी नावाचे दिसतील. पैसाच कमवायचा असेल तर, तुमच्या कडे असलेली बुद्धीमत्ता वापरून धंदा करा, महाराष्ट्राला देशो-धडीला लावू नका! बरं काही लोकांनी धंदा सुरु केलाय, काय तर म्हणे "धान्यापासून दारू", अक्कल आली पण तीही अशी उलटी! समस्त राजकारण्यांना या महाराष्ट्राच्या वतीने कळकळीची विंनती करतो, बरेच क्षेत्र आहेत ज्यात खूप पैसा आहे, सध्या गुंतवत आहात त्याच्या अर्धा जरी गुंतावालात तर चिक्कार पैसा मिळवाल; हा धन्यापासून दारूचा नाद सोडा आणि बियर-बार, मटका, भ्रष्ट गुत्तेदारी यातच पैसा आहे हा गैरसमज ही दूर करून घ्या. थोडसं इतर क्षेत्रांकडे लक्ष द्या कारण जग या १० वर्षात फार बदललय.
महाराष्ट्रातच नव्हे तर या देशात एकीकडे महगाई वाढत आहे-दुसरीकडे अन्नाची नासाडी, एकीकडे कामगारांची उणीव आणि दुसरीकडे बेरोजगारीचा डोंगर अशी विपरीत परिस्थिती आहे. शेतमालाला भाव नाही आणि महागाईवरील टी.व्ही. कार्यक्रमाना भरपूर टी.आर.पी; आहे काय हे? गेल्या दशकापासून पुन्हा सरंजामशाही परत आल्यागत चित्र आहे. बुद्धिवंत गेले, सच्चे विरोधक गेले, मातीतले नेते गेले आणि बाष्कळ, दिखाऊ नेते आले आणि खूप कमी विचार करणारी जनता आली. मी, माझं घर, माझी मुलं आणि माझी नोकरी इतक्याच विचारांनी चिंताग्रस्त. समाज विचारांनी आणि वृतीने खूप संकुचित झाला. स्वतःच्याच क्षणिक स्वार्था पायी त्याने स्वतःचेच दूरगामी नुकसान करून घेतले. सगळीकडेच अराजकता माजली आहे अस नाही, पण वेगळा विदर्भ मागितला जावा, माझ्याच राज्यातील शेतकऱ्याला आत्महत्या कराव्यालागाव्यात, माझ्याच राज्यात पुण्यासारख्या शहरात स्त्रियांवर अत्याचार व्हावेत, एकीकडे अंतर्गत सुरक्षेला स्फोटा मागून स्फोटांचा हादरा बसावा, दुसरीकडे माझे नेते मंडळी, टी.व्ही. आणि मी चित्रपटांवरून आणि धर्मावरून वाद घालावेत, वृत्तपत्रांनी त्याच्या शिवाय इतर काहीच छापू नये, कुठे होत आहे माझ्या महाराष्ट्राची वाटचाल? आलाच माझा शिवाजी राजा तर काय दखवू त्याला- विटंबलेले किल्ले, धान्यापासून बनवलेली स्वस्त दारूपिवून मास्तावलेले गुन्हेगार आणि त्यांनी अत्याचार केलेल्या स्त्रिया आणि बाळे, की अखंड महाराष्ट्र रात्री उपाशी पोटी झोपू नये म्हणून झीझलेल्या शेतकऱ्यांचे हाल आणि माजलेली गुन्हेगारी, की त्याच्याच मावळ्यांच्या ह्या नव्या पिढ्यांनी स्वराज्याची केलेली मुघली अवस्था? हे सगळ बदलायलाच हवं!
अवस्था खूप खराब असली तरी खरच खूप अशा आहेत, कारण महाराष्ट्राच्या मातीत अजून ही शिवाजी महराजांनी पेरलेले स्वाभिमानाचे बीज पुन्हा पुन्हा उगत आहे. शिक्षण, साहित्य, कला-लोककला स्वतःच्याका जीवावर होईना धडपडत पुन्हा नवं स्वरूप घेत आहे. यातूनच देशाचे नवे नेतृत्व तयार होईल. बुद्धिमत्ता खूप आहे पण त्या सोबतच जुन्या पिढीचे नितीमुल्यांचे धडे ही यांना गरजेचे आहेत. महाराष्ट्राच्या येणाऱ्या नेतृत्वाला अजूनही बाळासाहेब ठाकरे, शरद पवार सारख्या नेत्यांचे-कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आहे, त्याचा येणाऱ्या नव्या पिढीने उपयोग करून घ्यावा. ह्या दोघांनी निवृत्त होण्या आधी एकदा सगळ्यांचे कान पिळून जावे ही पण अपेक्षा. येत्या काहीच वर्षात याच महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून जावा, मुलांनी/मुलींनी रोज हसत गावाच्या 'मराठी' शाळेत जाव, इंग्रजीच्या तासात फाड-फाड इंग्रजी बोलावं, संगणकाशी अशी मैत्री करावी जसा दारातल वासरू आहे, त्यांच्या बापाला त्यांच्या भविष्याची चिंताच राहू नये, मुलीच्या लग्नाची(हुंड्याची) ही चिंता राहू नये, विहिरीत भरपूर पाणी असाव, ते पाणी शेताला देण्यासाठी वीज असावी, भरपूर पिक याव, घरातल कुणी आजारी पडलं की गावातच माणुसकीची जाणीव असणारा डॉक्टर असावा, गाव स्वच्छ असावा, गावातून शहराला चांगले रस्ते असावेत, त्या रस्त्यावर सरकारी बसेस असाव्यात, शहरात लोक असावेत पण अति नकोत, गावातला शेतमाला शहरात यावा, शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि शहरातल्या माणसाला ही तो रस्ता भावात मिळावा, मुली-बळींना खरं स्वातंत्र्य अनुभवता याव, खूप कारखाने असावेत, प्रदूषण नसावे तर तेथे रोजगार असावा, सगळ्यांच्या हाताला काम असल्याने गुंडगिरी नसावी, दारू पिऊन रस्त्यवर फिरणारे नसावेत की बायकोला घरी जावून मारणारे नसावेत, कर्म-कांड नसावं तर रोज गावाच्या मंदिरात सावळ्या पांडुरंगाच्या पुढे त्याच गुणगान करणारा वारकरी असावा, लोकप्रतिनिधींचा लोकांना आदर वाटावा इतके ते चांगले असावेत आणि दर वर्षी संयुक्त महाराष्ट्र दिन(विदर्भा सहित!) आम्ही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी सारखाच साजरा करावा; भले जमले तर आहेत त्या सीमा ही मिटवाव्यात आणि हृदयात खरे महाराष्ट्रीयत्व असलेले आम्ही वैश्विक नागरिक बनावे; हेच जिजाऊ.कॉमच नव्हे तर कदाचित प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचे स्वप्न.
पुन्हा एकदा ह्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी साठी लढलेल्या प्रत्येकाला स्मरून तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ ! जय शिवराय! जय महाराष्ट्र!
आपलेच कार्यकर्ते
नोट: सदर लेखात बऱ्याच भावना स्वप्नाळू वाटत असतील, पण आमचा त्या पूर्ण होतील यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, जातीय संघटनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. जाती-पातींवर वर आमचा विश्वास नाही असणारांचा आम्हाला द्वेषही नाही. जे जे राष्ट्रकार्याला उपयोगी आहे आणि बाधक मुळीच नाही अशा प्रत्येक कार्याचे/विचारांचे आम्ही स्वागतच करू. महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक तटबंदी कायम राखण्यासाठी मावळे होवून जमेल ते, जमेल तेथे, जमेल त्या संघटनेत प्रयत्न करूयात.
सदर लेख कुणी ही कुठे ही छापू शकते, इतरांना पाठवू शकते, कृपया फक्त जिजाऊ.कॉम चा उल्लेख करावा.
हाच लेख येथे डावूनलोड करा