Sunday, January 10, 2010

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब जयंती

[१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४] आज १२ जानेवारी; इतिहासातील असा दिवस जो प्रत्येक स्वाभिमानी मराठ्याने [मराठा-प्रत्येक महाराष्ट्रीय] आपल्या हृदयात कायमचा कोरून ठेवला पाहिजे.आजच्या या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवाबंसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली. आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.

या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले. स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.
कित्येक मावळ्यांनी आपले मरण पेलून धरून, त्याला घडीभर ताटकळत ठेवून हे स्वराज्य घडवले, टिकवले आणि वाढवले. हे स्वराज्य साकार होण्यासाठी कित्येकांनी आपले रक्त सांडलेले आहे. आणि हे असे घडायला, झोकून देऊन लढायला प्रवृत्त व्हायला गरज असते शिवबाची आणि तो शिवबा घडायला गरज असते ते जिजाऊचीच!
इतिहासाचे ज्ञान नसले तरी चालेल पण जान मात्र असायलाच हवी! या धावणाऱ्या जगात नक्कीच आपल्याकडे वेळ नाही. तसा तो कोणत्याच पिढीला नसतो. ज्याला त्याला आप-आपली कामे असतात; पण वेड लागल की वेळ मिळतो! त्यामुळे जमेल तेंव्हा इतिहास आठवून पहावा, त्यातून धडे घ्यावेत. चुकांना सुधारून पुन्हा चुका रहित इतिहास लिहावा. नाविन्य तर हवच; ते आणण्यासाठी ही स्वातंत्र्य घ्याव. पण हे सगळ करताना समोर कुणाचातरीआदर्श असला तर प्रवास आणि नव-निर्माण सुखकर जाते. वेगळ सांगायची गरजच नाही- इतिहास घडवनारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे कधीच इतिहास घडवू शकत नाहीत !!
आपल्या पिढीत प्रत्येकाला काही तरी करण्याची तळमळ आहे, प्रत्येका मध्ये ती जिद्द आहे; अहो, कारण आमचा इतिहासच तसा सोनेरी आहे, कारण आम्हाला वारसाच तसा लाभला आहे! रक्तात आहे ते दिसणारच ना मग! आज गरज आहे ती प्रेरणेची, एका योग्य दिशेची. आम्हाला काही प्रश्न पडले, कशी सापडेल हि दिशा? सामान्यातल्या अती सामान्या मध्ये सुद्धा एक वेगळेपण असते, त्याच्या मधे सुद्धा काही तरी करण्याची जिद्द असते, कसा मिळेल त्याला वाव? कशी मिळेल त्यांना काही तरी करण्याची संधी ? सगळी कडे अंधार असतांना कोण देईल त्यांना प्रकाश? सगळ राष्ट्र एकाच दिशेला पळतंय, बरं ती दिशा चूक की बरोबर हे तरी कुणी पडताळून पाहताय का? आम्ही प्रगती करत आहोत की इतर काही? आम्ही म्हणतो आकडेवारी नुसार राष्ट् प्रगती करत आहे. आम्हाला फक्त एका प्रश्नाच उत्तर द्या, होय तुम्हीच, तुम्हा जसा समाज आणि जस राष्ट्र हव आहे, ते हेच का? आकडेवारीला विरोध नाही पण शेवटचा माणूस सुखी आहे का? नसेल तर का नाही ? [कुणी म्हणत असेल- "होय, शेवटचा माणूस सुखी आहे", तर यजमान आपण खोट बोलत आहात! घरा बाहेर पडा एकदा!] आणि या सर्वांचे उत्तर शोधतांना कुठे तरी मनात येऊन जाते-

अंधार होत चाललाय दिवा पाहीजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे॥
आता, शिवबाच का? हा प्रश्न कुणाला जर पडला असेल तर, कृपया एक लक्षात ठेवा शिव-चरित्रा सारखा धगधगता दीपस्तंभ आपल्या समोर असतांना आपल्या सारख्या तरुणांना इतरत्र भटकण्याची गरज नाहीये. जगाच्या पाठीवर जिजाऊ, शिवबा आणि संभाजी सारखे व्यक्तिमत्व आपल्याला सापडणार नाही. आपल्याला ह्याचा अभिमान असला पाहिजे; त्यांचे चरित्र आमच्या मनावर कोरले गेले पाहिजे. जीवनाच्या वेगवेगळ्या प्रसंगांना कसे तोंड द्यायचे ह्याचे जातिवंत उदाहरण म्हणजे शिव चरित्र! कोलंबस किंवा सिकंदर ह्यांचा आम्ही आदरच करतो; पण, जेंव्हा आपण आदर्शासाठी प्रत्येक वेळी परकीयांकडे बघतो तेंव्हा काही ओळी आठवतात:

कशास हवा तूम्हा सिकंदर,

कशास हवा कोलंबस,

छ्त्रपतीला स्मरा एकदा, अरे छ्त्रपतीला स्मरा एकदा;

अन् बघा, तुम्हिच हो सिकन्दर, अन् तुम्हिच हो कोलम्बस, तुम्हिच हो कोलम्बस!


इतिहास हा नुसता पाठ्यपुस्तकाचा भाग न राहता तो आमच्या रक्तामध्ये भिनला पाहिजे. सामान्यांना तो आपला वाटला पाहिजे. खोटा अभिमान, स्वार्थी बाणा, आणि पोकळ गप्पा याला कुठल्याही प्रकारे महत्व द्यायला नकोय. प्रत्येकाने थोडेसेच पण काही तरी करावे, भले ते कुठेही असो. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्याप्रती आपले काही कर्तव्य आहे. आज ही स्वातंत्र्य शेवटच्या लोकांपर्यंत पोचले नाहीये, गरीब श्रीमंत ही दरी वरचेवर वाढत चालली आहे. समाजामध्ये "बळी तो कान पिळी" हि भावना वाढत चालली आहे. खाली असणारा आज सर्व बाजूने दाबला जात आहे. हे चांगल्या समाजाच्या निर्मितीचे लक्षण नाहीये. विचार करा, तुमच्या मुलाला तुम्हाला हव ते शिक्षण द्यायचे आहे, देता येईल? हवा तो व्यवसाय करायचा आहे, करता येईल? समजा त्याला राजकारणात जायचे आहे, सोप्पा आहे का ते? आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे काही अंशी का होईना फक्त दिखाऊ-उच्चांक आपण गाठत आहोत. पटत नसेल तर, वरील काही प्रश्नांना एकदा खरी-खुरी उत्तरे देऊन पहा.
ही परिस्थती बदलण्याची गरज आली आहे आणि त्यासाठी गरज आहे अशी भावना बाळगणाऱ्या, ही भावना समजणाऱ्यानी एकत्र येण्याची! थोडे थोडकेच असले तरी चालती, पण प्रयत्न करणारे असावेत. अशा युवकांना आमचे आवाहन आहे- एकत्र या! काही तरी करण्याची हीच भावना आपल्या सर्वां मध्ये एक नाते निर्माण करते आहे. कुठे काही चांगले होत असल्यास पुढे होऊन अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन द्या. कुठे काही चूक घडत असल्यास त्याच्या आड येण्याची हिम्मत ही ठेवा. तुमच्यासारखे या जगात खूप आहेत आणि नक्कीच तुमच्यासोबत उभे राहतील. आपले विचार प्रकट करा, त्या विचारांना आचरणात आणा, आपल्या स्वतःची आणि आपल्या समाजाची निर्मिती अथवा विकृती ही आपल्याच हाताने होत असते. बदल घडलाच पाहिजे आणि तो आपणच घडवायचा आहे. कदाचित प्रश्न पडत असेल की मीच का आणि आत्ताच का? तर, एक लक्षात ठेवा- तुम्ही नाही तर कोण? आणि आता नाही तर कधी?
जिजाऊ.कॉम आपल्याला एका स्वतंत्र आणि स्वाभिमानी विचारांच्या चळवळी साठी आवाहन करते आहे. आपल्या सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करत आहे. या साठी गरज आहे आपल्या सहकार्याची. आम्हाला मान्य आहे, ही तर या कार्याची फ़क़्त सुरुवात, पण हाती घेतलेले हे कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकपणे पुढे नेत राहू हा विश्वास तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो. एका सुखी संपन्न आणि प्रगत महाराष्ट्राचे आणि देशाचे स्वप्न साकारण्या साठी जिजाऊ.कॉम ची आपल्या सर्वांना ही भावनिक साद- काही करा आणि कुठे ही करा, पण करा. ज्याने राष्ट्र घडेल!
जिजाऊ मा साहेब ह्यांच्या ह्या जन्मदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम! त्यांनी आम्हाला एक इतिहास दिला, आम्हाला आमची एक ओळख दिली, आम्हाला शिवबा दिला, आम्हाला त्यांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांचा शंभू बाळ दिला, आज आम्ही काय देणार त्यांच्या ह्या महाराष्ट्राला?
आपण प्रत्येकजण त्यांना एक वचन देऊ - ''राष्ट्राच्या निर्मितीचे कार्य माझेच आहे अस समजेन आणि तिच्या साठी मला शक्य होतील ते आणि शक्य होईल तिथे प्रयत्न करेल. चांगले बदल घडवेल आणि त्यांची सुरवात माझ्यापासून करेल".
हे आई जिजाऊ, आम्हास ते बळ दे, तो आशीर्वाद दे!

जय जिजाऊ ! जय शिवराय !!

-जिजाऊ.कॉम परिवार
www.jijau.com


सदर कार्यात सहभागी व्हा, तुम्ही आमच्या पाठीशी नव्हे तर सोबत रहा. समविचारी लोकांना एकत्र करण्यसाठी आणि राष्ट्र निर्मितीत या नव्या लोकशाही मार्गाने जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. लोकसहभागाशिवाय आम्ही अपूर्ण आहोत. कारण हा शिवधनुष्य आमच्या एकट्याने पेलणे फार अवघड आहे. कृपया नोंदणी करा आणि आपल्या मित्रांना ही नोंदणी करण्यासाठी सांगा, आणि आज जिजाऊ जयंती निमित्य एक लाख नोंदणीचे उदिष्ट पूर्ण करण्यास मदत करा.
नोंदणी साठी कृपया भेट द्या: http://www.jijau.com/you-can-contribute/callforcontent/नोंदणी



No comments:

Post a Comment