जय महाराष्ट्र,
महराष्ट्राचा हा केला गेलेला 'जय' अजून ही जनतेचा राजा शिवाजी महाराज यांच्याच कर्तुत्वाचा आहे. शतके लोटली आणि आम्ही अजून ही त्यांच्याच कर्तुत्वावर समाधानी आहोत आणि एकप्रकारे आमच्या [माझ्या] नाकर्तेपणाचा अभिमान बाळगत आहोत.
मधल्या काळात काही लोकांनी खूप प्रयत्न केले, पुन्हा तसे कर्तुत्व गाजवण्याचे [त्यांच्या प्रयत्नांना सलाम], पण पुन्हा त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जावा अस अजून ही काही झालेल नाही. दुसऱ्या कोणत्या राज्याचं अस झाल की नाही हे मला माहित नाही; पण महाराष्ट्राच नक्की व्हाव अशीच इच्छा महाराज बाळगत असतील! हे म्हणजे बापाच्या नावाची पाटी घराच्या दारावरून जाऊन तिथ लेकराच्या नावाची पाटी येते, तेंव्हा या गोष्टीचा बापाला अभिमानच वाटतो. हा अभिमान आम्ही महाराजांना कधी देणार?
आज महाराष्ट्राची identity /ओळख काय आहे? मुंबई, पुणे ज्यात आहे ते राज्य, जिथे बरेच गड आहेत ते राज्य आणि खरी ओळख म्हणजे जिथे शेतकरी खूप आत्महत्या करतात ते राज्य, खूप साऱ्या शिक्षणसंस्था असणारे राज्य आणि आपल्याला नक्की प्रवेश मिळतो तिथे [असा बाहेरच्या राज्याच्या लोकांचा समज आणि दुर्दैवाने खरा!] . बाकी आमची खरी ओळख जी असावी ती कुठे यात दिसतच नाही. आम्ही विधायक सामाजिक क्रांतीचे, प्रबोधनाचे, शिक्षण क्रांतीचे, सर्वसमावेशक आर्थिक प्रगतीचे शिलेदार असायला हवे होतोत. आहोत का आम्ही? [हे माझे प्रश्न आधी मला स्वतःला आणि नंतर इतरांना आहेत].
माझ्या राज्याच मी [सामान्य माणूस] आणि या राजकारण्यांनी काय करून ठेवलय हेच मला कळत नाहीये. सामाजिक समतेच घ्या, अजून ही साऱ्या राज्यात दलित -बहुजन -उच्चवर्णीय असा भेद अजून ही कायम आहे. सगळी कडेच आहे.अस काही नाही असं कुणी जर म्हणत असेल, तर त्यांनी कृपा करून हे सांगावा की का मग दलितांचे मते जास्त भा.रि.प ला जातात, बहुजनाची मते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला जातात, ब्राम्हणांची मते बी.जे.पी ला का जातात? त्यात पुन्हा मुस्लीम मते बी.जे.पी ला जाताच नाहीत. का आमचा अजून ही इतर जातीय किंवा धर्मीय नेत्यावर/व्यक्तीवर पूर्ण विश्वास नाही. का आम्ही अजून ही गुरा-ढोरांसारखे कळपा-कळपा ने राहतो? या जातीची एक संघटना, त्या जातीची एक संघटना; मग त्या प्रत्येकीला एका राजकीय पक्षाचा पाठींबा छुपा किंवा मग बेधडक!
एकंदर आम्ही पूर्ण हरलो नसलो तरी, सामजिक विषमते विरुद्धची लढाई जिंकण्याची लक्षणं अजूनही दिसत नाहीत! आणि सगळ्यात महत्वाच ही लढाई जिंकण्यासाठी काही करायला पाहिजे ही मानसिकताही स्वार्थी राजकारण्यांमध्ये दिसत नाही. जो पर्यंत झुंडशाही ने आणि कळपांना पोसून आम्हाला सत्ता उपभोगता येते आणि स्वार्थ साधता येतो, तो पर्यंत प्रगतीचे 'ब्रॉड पिक्चर' पहायची आमची इच्छाच नाही; नव्हे गरजच नाही, असा आव यांनी [राजकारण्यांनी] आणलाय! बदल घडायलाच हवा!
अंधश्रद्धा आणि जाचक रूढी परंपरांना अजून ही आम्ही पूर्णतः उपटून टकलू शकलो नाहीत. कधी कधी वर्तमानपत्रात त्या कुणाला तरी चेटूक करते/करतो म्हणून जळलेल्या, मारलेल्या बातम्या येतातच! आजही आम्ही आमच्या आय बहिणींना हव ते आदराचा स्थान देत नाहीत. शिक्षणाने ते होतेय, पण वेग कमी आहे. ज्या स्पीड ने यांच्या स्लोगन बनतात त्या स्पीडने प्रगती का होत नाही हेच मला कळत नाही! नवीन विचारांना अजून ही आम्ही हवा तो आदर देत नाहीत, बदलाचं आम्हाला का इतका वावडं आणि ते ही स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षां नंतर ही? असं वाटत, हे कुणी जाणून-बुजून तर करत नाही ना! या जाचक रूढी बद्दल कायदे व्हायला हवेत आणि त्यांची मुख्य म्हणजे अंमलबजावणी व्हायला हवी!
उच्चशिक्षणाच्या बाबतीत आम्ही खूप काही केल आणि पैशाने उच्च असणाऱ्याना सहज शिक्षण दिले. तस नाहीये तर मग का शेतकऱ्याची आणि सामान्य माणसांची मुलं सहजा सहजी डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाहीत? शिक्षण क्षेत्रातील काही नियम आणि अटी तर इतक्या जाचक वाटत, जसं काय सामान्य आणि गरीब मुलांनी शिकूच नये या साठीच बनवल्यात! अगदी कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रात आम्हाला जितक पुढ नेलं, तितकच मागे आणि त्यापेक्षाही गतीने हे 'स्वयंघोषित शिक्षण सम्राट' गरीब-दलित-सामान्य यांना शिक्षणा पासून दूर घेऊन जात आहेत. मला वाटते शिक्षण हे लोकांकडून पैसा काढण्याचे मध्यम असूच नये, ती सुविधा चालवण्यासाठी पैसा यावा तो कमावणाऱ्या वर्गा कडून कर आणि इतर स्वरुपात, मग हीच शिक्षण घेतलेली लोक पुनः त्याच शिक्षण क्षेत्रातला आर्थिक योगदान देतील. मग त्यांच्या कमाईसाठी शासनाने रोजगाराच्या संधी द्याव्यात, रोजगार देणारे निर्माण करावेत. हे इको-सिस्टीम एकदा बनलं की मग बघा प्रगतीची चक्र जसी स्वतः इंटीलीजंट असल्यासारखी फिरत राहतील. 'पण हे चाक बनवायच कसं' हा विचार करण्याइतपत हुशार प्रतिनिधी आमच्याकडे आहेत का? शंभर वर्षांचा विचार करणारे लोक आमच्याकडे आहेत का ? नाहीत असच दिसतंय. किंवा असतील तर मग त्यांना संधी दिली जात नाही; ती संधी असे लोक शोधून त्यांना द्या, तुमच आणि तुमच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांच कल्याण होईल.
Inclusive Growth च्या नावाने आम्ही गेली पन्नास वर्ष बोंबा मारत आहोत, कुणी 'शायनिंग भारत' म्हणत तर कुणी 'आमचा हात सामान्य माणसाच्या हातात' [दोन्हींनी गोष्टी घडतात, पण फक्त मतदानाच्या वेळेस]! सर्वांगीण विकासाचा सर्वसमावेशक विकासाचा स्वप्न बापूंनी या देशासाठी पाहिलं. महाराष्ट्रात ही अनेक नेत्यांनी हे स्वप्न पाहिलं, पण पूर्ण कुणी आणि किती केला हे ठरवण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्र बघायलाच हवा. आम्ही तसं तर अजून देश पातळीवरच अजून 'सेल्फ रेलायबल इकॉनॉमी' बनू शकलो नाहीत, प्रत्येक माणसाच्या पातळीवर तर दूरच! सगळ्यात जास्त दुःख होतेय ते याच कि, ह्या राष्ट्राच्या अस्तित्वाचा पाया जो होता, तिथे घर ना बांधता आपण कुठे तरी दुसरीकडेच घर बांधत आहोत अस दिसतंय. आम्ही आधी पासून कृषी प्रधान देश; मग आम्ही कृषीतच मागे का? किंवा मग त्याच्याची संबंधित व्यवसायामुळे आम्हाला का ओळखले नाही जात? का आम्ही सर्विस प्रोव्हाइडर म्हणून ओळखले जातो? आमच्या कडे खूप बुद्धिमान लोक आहेत हा कांगावा ही आम्हीच करायचा आणि संशोधनाच्या नावाने बोंबा-बोंब! ही परिस्थिती राष्ट्राची आहे आणि तशीच महाराष्ट्राचीही! बदलायलाच हवी. आमच्या साठी फक्त मुंबई किंवा पुणे हा प्रश्न कधीच नव्हता आणि नसायला ही हवा, कारण महाराष्ट्र फक्त या दोन शहरांचा होत नाही. खरा महाराष्ट्र इथच्या खेड्यांनी आणि तिथच्या लोकांनी बनतो. 'मुंबईचा' 'शांघाय' करा अथवा नका करू, पण माझ्या 'महाराष्ट्राचा' पुन्हा 'महा-राष्ट्र' नक्कीच व्हायला हवा! तो झालाच पाहिजे आणि करावाच लागेल! असं करणारीच लोकं सत्तेत आणि शासनात हवीत.
बदल घडायला हवा आणि तो घडवण्याची वेळ आणि संधी आली आहे, दूर दृष्टी ठेवणारे मग अपक्ष का असेनात, कुणा पक्षाचे का असेनात निवडून आलेच पाहिजेत! त्यांना पडाल तर, फक्त सत्तेसाठी आणि ती ही स्वार्थासाठी असं राजकारण करणाऱ्यांच्या हातात राज्य देऊन फक्त स्वतःचच नाही तर पुढच्या पिढ्यांचं आणि शिवबाच्या महाराष्ट्राच वाटोळ कराल!
जय महाराष्ट्र! जय शिवाजी! जय जिजाऊ !
प्रकाश बा. पिंपळे
3 comments:
माझा महाराष्ट्र या बद्दल ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्यांच्या सोबत काही POSITIVE गोष्टी लिहिल्या तर महाराष्ट्राचा अभिमान सर्वांच्या मनात येयील आणि त्यातूनच काही तरी करण्याची इच्छा निर्माण होऊ शकेल .
अतिशय उत्कृष्ट पोस्ट. आपण पक्षाला मतदान करतो माणसाला नाही. पक्षाच्या नावाखाली आपण कुठल्याही गुन्हेगाराला मतं देण्यास तयार असतो. आपली सदसद विवेक बुध्दी गहाण ठेउन मतदान करण्याची परंपरा मोडीत काढायला हवी.
अतिशय सडेतोड लेख.. महाराष्ट्राबद्दल पॉझिटीव्ह गोष्टी तर आता शोधायची गरज आलेली आहे.
धन्यवाद काका. ह्या बदलाचे आम्ही नवी पिढी नक्कीच पिक बनू. आपल्यासारख्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत राहो!
Post a Comment